
ओतूरला मोबाइल टॉवरला आग, जीवितहानी नाही
ओतूर(जुन्नर) : येथील शनिमंदिरा जवळ येथे अशोक काशिद( गुरूजी) यांच्या इमारतीवर बसवलेल्या मोबाइल कंपनीच्या टॉवरला शुक्रवारी सायंकाळी मोठी आग लागली. यात मोबाइल टॉवरची संपूर्ण यंत्रणा जळून खाक झाली आहे. आगीचा प्रकार लवकर निदर्शनास आल्यामुळे या इमारतील सर्व नागरिक वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.आग लागल्याची घटना समजताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशूराम कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच आग शमविण्यासाठी जुन्नर नगरपरिषदेच्या पाण्याच्या बंबास प्राचारण करण्यात आले.
उंच इमारतीवरील टॉवरला लागलेल्या आगीचे उंच उंच लोळ उठल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. तसेच नागरिकांनामध्ये भितीचे वातावरण होते. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. जुन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमक बंब आल्यावर आग आटोक्यात आली. मात्र, प्रशासनाकडून विविध प्रकारच्या मोबाइल टॉवरला भरवस्तीतील इमारतीवर परवानगी देऊन त्या परीसरातील नागरिकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळच खेळला जात आहे.
हेही वाचा: जैववैविध्यतेतील सौंदर्य टिकविण्याचे आव्हान
ओतूर व परिसरात अनेकदा आगीच्या मोठमोठ्या घटना घडल्या असून त्यात आर्थिक नुकसान बरोबरच कित्येकदा जीवितहानीही झाली आहे. ओतूरचे वाढते शहरीकरण व काल सायंकाळी मोबाइल टॉवरला भरवस्ती लागलेल्या आगीची घटना पाहता ओतूर ग्रामपंचायतींने स्व-मालकीचा अग्नीशामक बंब घ्यावा अशी मागणी ओतूरचे माजी सरपंंच व विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे यांनी केली आहे.
''जुन्नर तालुक्यात शेकडो मोबाइल टॉवर असून यामध्ये कित्येक टॉवर अनाधिकृत आहे. जे अधिकृत आहे. त्याचा ही कोट्यावधीचा महसूल थकीत आहे. ओतूर ग्रामपंचायतीचा वीस लाखांपेक्षा जास्त महसूल मोबाइल टॉवर कंपन्याकडे थकीत आहे. प्रशासकीय पातळीवर दखल घेवून युध्द पातळीवर महसूल वसूल करावा अन्यथा टॉवर बंदची कारवाई करावी तसेच कालची घटना पाहता तालुक्यातील सर्व मोबाइल टॉवरचे प्रशासकीय पातळीवर फायर ऑडीट करावे'' अशी मागणी जुन्नर तालुक्यात भाजपा अध्यक्ष व ओतूरचे माजी सरपंच संतोष तांबे यांनी केली आहे.