esakal | कोविड रुग्णालयांचे युद्धपातळीवर होणार फायर ऑडिट

बोलून बातमी शोधा

Covid care Center
कोविड रुग्णालयांचे युद्धपातळीवर होणार फायर ऑडिट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील तब्बल ६२७ कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट येत्या १० दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नऊ सदस्यांची समितीही स्थापन केली आहे. युद्धपातळीवर हे ऑडिट पूर्ण करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे.

अनेक ठिकाणी कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट होत नसल्याचे उघड झाले आहे. नाशिकच्या धर्तीवर त्यातून एखादी दुर्घटना होऊ नये, या उद्देशाने हे फायर ऑडिट होणार आहे. त्यात इलेक्ट्रिकलचेही ऑडिट होईल. पुणे महापालिका हद्दीत अग्निशामक दल, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत त्यांचे अग्निशामक दल तर, जिल्ह्यातील फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट पीएमआरडीए आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) करणार आहे. खासगी रुग्णालयांसाठी २० खासगी फायर ऑडिटरर्सची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक कोविड रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून राज्य सरकार आणि महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट होणार आहे. त्यात त्रुटी आढळल्यावर त्याची पूर्तता करावी लागणार आहे. या ऑडिटचा अहवाल येत्या १५ दिवसांत विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. महापालिकेची आणि खासगी कोविड रुग्णालयाचाही त्यात समावेश आहे.

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासादायक! नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक

अशी आहे समिती

  • पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे समितीचे अध्यक्ष

  • अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिव

  • जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी (जिल्हा परिषद), पुणे महापालिकेचे अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवडचे अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीएचे अग्निशमन अधिकारी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सदस्य

  • जिल्ह्यात पीएमपीआरडी आणि एमआयडीसी फायर ऑडिट करणार

  • खासगी रुग्णालयांचे ऑडिट फायर कॉन्ट्रक्टर ॲण्ड कन्सल्टंट असोसिएशन करणार

शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट दहा दिवसांत पूर्ण होईल. त्याचे नियोजन झाले आहे. तसेच इलेक्ट्रिकल ऑडिटचाही आराखडा तयार होत आहे. कोविड केअर सेंटर्सचे ऑडिट स्थानिक प्रशासनाने करायचे आहे. नगरपालिका क्षेत्रात त्यांचा अग्निशमन विभाग फायर ऑडिट करेल. या प्रक्रियेत खासगी परवानाधारक फायर ऑडिटर्सची मदत घेत आहोत. त्यांची यादी पीएमआरडीएच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे.

- सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार समितीची बैठक झाली आहे. त्यानुसार कामकाजाला तातडीने प्रारंभ झाला आहे. पुणे शहरातील कोविड केअर सेंटर्सचे ऑडिटचे काम सुरू झाले आहे. येत्या १५ दिवसांत त्याचा अहवाल समितीपुढे सादर करण्यात येईल.

- प्रशांत रणपिसे, अग्निशमन अधिकारी, पुणे महापालिका