पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

- बचावकार्य करताना अग्निशमन दलाचे जवान झाले हुतात्मा.

- साडेपाच तासांहून अधिक काळ सुरु होते बचावकार्य.

पिंपरी : फुगेवाडी उड्डाणपूल येथील आनंदवन वसाहत परिसरात खोदण्यात आलेल्या सुमारे 25 फूट खोल खड्डयात रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजता बिगारी मजूरांसह एकूण तीन जण अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाचेही तीन जवानही आजूबाजूच्या ढिगाऱ्याची माती अंगावर पडून गाडले गेले. बचावकार्य करताना अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव हुतात्मा झाले. मात्र, इतर दोन जवानांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. रात्री उशिरापर्यंत साडेपाच तासांहून अधिक काळ हे बचावकार्य सुरु होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

फुगेवाडी उड्डाणपूल येथील आनंदवन वसाहत परिसरामध्ये महापालिकेच्या अमृत योजनेअंतर्गत जलनिस्सारण वाहिनीचे काम चालू आहे. यासाठी सुमारे 25 फूटांपर्यंतचा खोल खड्डा करण्यात आला. त्यामध्ये बिगारी मजूरासह एकूण तीन जण अडकले. 

पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश कल्याणी जमादार (वय 22, रा.दापोडी, मूळ रा.बडदाल गाव, ता.अफजलपूर, जि.गुलबर्गा, कर्नाटक) हा बिगारी मजूर सर्वप्रथम खड्डयात गाडला गेला. त्याला वाचविण्यासाठी सीताराम कैलास सुरवसे, ईश्‍वर सूर्यकांत बडगे हे दोघेजण गेले. मात्र, ते देखील खड्डयात अडकले. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले. त्यातील 5 ते 6 जवानांचे बचाव पथक मजूरांना बाहेर काढत असताना फायरमन विशाल जाधव, सरोश फुंडे आणि निखील गोगावले यांच्यावर आजूबाजूची माती पडून ते देखील त्यात गाडले गेले. त्यामुळे दुर्घटनेचे गांभीर्य आणखी वाढले.

भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ

अग्निशमन दलाचे एकूण 5 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, एनडीआरएफच्या बचाव पथकालाही मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले. इतर जवानांनी फायरमन फुंडे, गोगावले यांना बाहेर काढण्यात यश आले. तर विशाल जाधव यांना बाहेर काढल्यावर त्यांना वैद्यकीय उपचासाठी दाखल केले असताना डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

सुमारे साडेपाच तासांहून अधिक काळ गाडले गेले

बिगारी मजूर जमादार, सुरवसे आणि बडगे हे तिघे सुमारे साडेपाच तासांहून अधिक काळ गाडले गेले. त्यांना बाहेर काढण्यापूर्वी बचाव पथकाने त्यांच्यासाठी ऑक्‍सिजनही पुरविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती कळताच महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, आशा शेंडगे, माई काटे आदी घटनास्थळी दाखल झाले. 

अमृत योजनेचे काम होते चालू

सहा महिन्यांपूर्वी अमृत योजनेसाठी 150 मीटरची भूमिगत सांडपाणी वाहिनी टाकण्यात आली होती. उर्वरित 70 मीटर वाहिनीचे काम चालू असताना ही दुर्घटना घडली. 

ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : आयुक्त

या दुर्घटनेत सकृतदर्शनी ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्यामुळे तत्काळ दोन सदस्यीय समिती नेमून या दुर्घटनेस जबाबदार व्यक्तीविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire Brigade Jawan Martyr in Rescuing other peoples