Pune News : गॅस गळतीमुळे सदनिकेत आग; अग्निशमन दल घटनास्थळी पोचल्याने अनर्थ टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire due to gas leak

Pune News: गॅस गळतीमुळे सदनिकेत आग; अग्निशमन दल घटनास्थळी पोचल्याने अनर्थ टळला

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी गावच्या हद्दीतील शिवनगर मधील धारेश्वर आंगण या सोसायटीतील सदनिकेत गॅस गळती होऊन आग लागली होती. आगीत घरातील कपडे व इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत मात्र पुणे पालिकेचे अग्निशमन दल वेळीच पोचल्याने जीवीत हानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून गॅस सिलिंडर मधून सुरू असलेली गळती प्रसंगावधान राखून बंद केली. धारेश्वर आंगण या सोसायटीतील चौथ्या मजल्यावरील सदनिकेत पती-पत्नी भाडेकरू म्हणून राहत आहेत. सकाळी दोघेही आवरुन कामावर गेले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सदनिकेतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे इतर रहिवाशांनी पहिले.

तात्काळ याबाबत पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. सोसायटीतील इतर रहिवासी तातडीने खाली येऊन थांबले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सदनिकेच्या काचा फोडून व दरवाजा तोडून जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. प्रसंगावधान दाखवत जवानांनी गॅस सिलिंडर मधून सुरू असलेली गॅस गळती बंद केली. आगीमुळे घरातील कपडे व इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दिव्यामुळे आग भडकली.....

आगीची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी हेमंत राणे व सुनिल परसैय्या हे संबंधित ठिकाणी दाखल झाले होते. संबंधित महिलेने सकाळी देवपूजा केल्यानंतर देवघरात दिवा लावलेला होता. गॅस गळती झाल्यानंतर त्या दिव्यामुळे आग भडकली असावी असा अंदाज पाहणी केल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी वर्तवला आहे.