भोरमध्येे चिमुकल्यांनी विझविला वणवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

गोकवडी गावातील मुलांचा आदर्श इतरांनी व शेतकऱ्यांनी घ्यावा आणि वणवा विझविता येत नसेल; तर किमान वणवे लावू नका.
 - आशा भोंग, उपविभागीय वनाधिकारी, भोर

भोर - डोंगराला लागलेला वणवा गोकवडी (ता. भोर) येथील चिमुकल्यांनी जागरूकता दाखवीत विझविला. त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टळले. चिमुकल्यांच्या कामगिरीचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले. नागरिकांनी चिमुकल्यांपासून धडा घेण्याचे आवाहन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वनराई संस्थेने आदर्श गाव जाहीर केलेल्या गोकवडी येथील पंधरा- वीस मुले रविवारी (ता. २६) दुपारी सुटीच्या दिवशी शाळा व विद्यालयात जाणारी डोंगरालगतच्या माळरानावर क्रिकेट खेळत होती. त्या वेळी डोंगरातून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर मुलांनी लगेचच खेळ थांबविला आणि डोंगराकडे धाव घेतली. मोठ्या मुलांनी झाडांच्या फांद्या तोडून लहानांच्या हातात दिल्या आणि एका बाजूने वणवा विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे दोन तास मुले वणवा विझविण्याचा प्रयत्न करत होते. 

दरम्यान, गावातील काही तरुणांनीही याबाबतची माहिती मिळताच डोंगराकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी वनरक्षक पी. ए. माने हे ग्रामस्थ बापू बांदल, पंढरीनाथ बांदल व उमेश बांदल यांच्यासमवेत घटनास्थळी गेले. त्यांनी वणवा पूर्णपणे विझल्याची खात्री केली. त्यांनी वणवा विझविणाऱ्या मुलांचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire extinguished in bhor by child