#अग्नितांडव : झोपडपट्ट्यांचे होणार सेफ्टी ऑडिट (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

झोपडपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशामक दल आणि यंत्रणांसमोर अडथळे निर्माण होत असल्याने शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात येणार आहे.

पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशामक दल आणि यंत्रणांसमोर अडथळे निर्माण होत असल्याने शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात येणार आहे. झोपड्यांची संख्या, त्यांचे स्वरूप आणि रस्ते याची माहिती घेऊन स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार असून, ज्यामुळे अग्निशामक यंत्रणा सहजरीत्या नेमक्‍या ठिकाणी पोचू शकणार आहे. या उपाययोजनेमुळे आगीच्या घटना वेळीच रोखणे शक्‍य होणार आहे. 

शहर आणि उपनगरांमध्ये साडेपाचशे घोषित आणि साडेचारशे अघोषित झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांत दाट झोपड्या असून, तेथील रस्ते अरुंद आहेत. त्यातही काही झोपड्यांसमोरील रस्त्यालगत ओटे आणि अन्य प्रकारची बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहने ने-आण करताना अडथळे येतात. आगीच्या घटनेदरम्यान तर अग्निशामक दल आणि अन्य यंत्रणा नेमक्‍या ठिकाणी पोचू शकत नसल्याचे दिसून आले आहे. शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटजवळील झोपडपट्टीत आग लागली तेव्हाही अग्निशामक दलाचे बंब आणि टॅंकर घटनास्थळी पोचण्यात अडथळे आले.

त्यामुळे आग आटोक्‍यात आणण्यात विलंब झाला. परिणामी, आगीच्या घटनेमुळे वित्तहानी वाढत असल्याने  खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 

झोपडपट्ट्यांत आग लागण्याच्या घटना वाढल्या असून, गेल्या तीन वर्षांत आगीच्या पाच मोठ्या घटना घडल्याची नोंद आहे. त्यात, पाटील इस्टेट, कोथरूड, डायस प्लॉट व येरवड्यातील घटनांचा समावेश आहे. झोपड्यांच्या रचनेमुळे अग्निशामक दलाला घटनास्थळी पोचताना कसरत करावी लागली होती. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 

झोपडपट्ट्यांतील सेवा-सुविधा वाढविण्यात येणार असून, त्यात एखादी दुर्घटना घडल्यानंतर अडचणी येऊ नयेत, याकरिता स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात येईल. त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire Slum Safety Audit