पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी उरले पाच दिवस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

पुणे पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी मोहीम सध्या सुरु आहे. या मोहिमेची अंतिम मुदत 5 नोव्हेंबरपर्यंत आहे.    

पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील विद्यमान सदस्य आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कार्यकाळ पुढील वर्षी जुलै महिन्यात संपत आहे. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक येत्या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी मोहीम सध्या सुरु आहे. या मोहिमेची अंतिम मुदत 5 नोव्हेंबरपर्यंत आहे.    

यासाठी नोंदणी करण्यासाठी पदवी किंवा पदविका असणे अनिवार्य आहे. या मतदारसंघाच्या मतदारासाठी प्रत्येक निवडणुकीच्यावेळी नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील तहसील कार्यालयात मतदार नोंदणी फॉर्म भरावा लागतो. या फॉर्मसोबत पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाची मार्कशीटची प्रमाणित झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचे एक छायाचित्र, मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड किंवा रेशनकार्ड किंवा रहिवासी दाखला किंवा लाईट बिल (यापैकी कोणताही एक रहिवासी पुरावा) जोडणे आवश्यक आहे.  

नवीन मतदार नोंदणीसाठी एक नोव्हेंबर 2016 पूर्वीचा पदवीधर असणे आवश्यक आहे. मागील नोंदणी रद्द झाली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five days Remaining for Graduate Constituency Voter Registration