esakal | Postive Story : पुणे-गडचिरोली मदतीचा ‘मॉडर्न’ सेतू

बोलून बातमी शोधा

Five The destitute children got support Due to alumni WhatsApp group

माजी विद्यार्थ्यांच्या ‘व्हॉटस्‌अॅप’ ग्रुपमुळे पाच निराधार मुलांना मिळाले छत्र

Postive Story : पुणे-गडचिरोली मदतीचा ‘मॉडर्न’ सेतू
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : आपल्याही ‘व्हॉटस्‌अॅप’वर शाळेचे, महाविद्यालयातील असे असंख्य ग्रुप असतात. अशा ग्रुपमध्ये अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगतात. अहो, पण अशाच ग्रुपमधील गप्पांमधून कोसो दूर असणाऱ्या एखाद्या निराधाराला निवाऱ्यांचा आधार मिळालं तर!! आश्चर्य वाटतंय ना!! अहो, पण हे प्रत्यक्षात घडलंय.

शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील १९९२च्या (वाणिज्य शाखा) बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉटस्ॲप‌ ग्रुपवर एक संदेश आला. अवघ्या काही दिवसांत आर्थिक मदत उभी राहिली आणि कोसो दूर असणाऱ्या गडचिरोलीतील आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या पाच निराधार लेकींना आधार मिळाला. गडचिरोली जिल्ह्यातील छल्लेवाडा (ता. अहेरी) या अतिदुर्गम गावातील राणी, नुशा, कावेरी, लक्ष्मी आणि जमुना या पाच मुलींचे मातृछत्र २०१३मध्ये हरपले. त्यानंतर वडील तिरुपती दुर्गे मुलांचा सांभाळ करायचे. मात्र, डिसेंबर २०२०मध्ये वडिलांनी साथ सोडली आणि या मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

एवढेच नव्हे, तर एक वेळचे जेवण मिळणेही शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. हे उपपोलिस स्टेशन रेपनपल्ली येथील प्रभारी अधिकारी विश्वास शिंगाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ मुलांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. परंतु एवढे करून प्रश्न सुटणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच आपल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर या मुलींना निवारा मिळावा, यासाठी मदतीचे आवाहन करणारा संदेश पाठविला. हा संदेश शहरी भागातील अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर फॉरवर्ड होताच त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या नांदेड येथील पोलिस निरीक्षक प्रशांत पवार यांनी आपल्या वर्गमित्रांच्या ग्रुपवर तो संदेश फॉरवर्ड केला. तो ग्रुप होता शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील (वाणिज्य शाखा) १९९२च्या बॅचचा.


''पोलिस निरीक्षक दत्ता भापकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी ग्रुपवर हा विषय मांडला आणि या मुलींची गडचिरोलीतच राहण्याची आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या व्यवस्था केली. आमच्या ‘बॅच’ने पुढाकार घेतला आणि मोठा निधी जमा केला. त्यातून मुलींना हक्काचे घर मिळाले.''
- अॅड. शिवराज कदम जहागीरदार, ग्रुपमधील सदस्य