पाचशेची लाच घेणाऱ्याकडे ३६ लाख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

 नारळ व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या मुकादमाच्या घराची झडती घेतल्यानंतर तेथे तब्बल ३६ लाख रुपयांची रोकड व दहा तोळे सोने सापडले.

पुणे - नारळ व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या मुकादमाच्या घराची झडती घेतल्यानंतर तेथे तब्बल ३६ लाख रुपयांची रोकड व दहा तोळे सोने सापडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुकादमासह दोघांना अटक केल्यानंतर शनिवारी रात्री मुकादमाच्या घरी झडती घेतली. न्यायालयाने दोघांना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुनील रामप्रकाश शर्मा (वय ५५, रा. वडगाव शेरी, नगर रस्ता, क्षेत्रीय कार्यालय) आणि बिगारी गोपी मच्छिंद्र उबाळे (३२, रा. वडगाव शेरी, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या नारळ विक्री स्टॉलवर कारवाई न करण्यासाठी मुकादम शर्मा व उबाळे यांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, तडजोडीअंती पाचशे रुपये देण्याचे निश्‍चित झाले होते. लाच स्वीकारताना शनिवारी अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली होती. 

दरम्यान, दोघांना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी अधिक तपासासाठी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार, विशेष न्यायाधीर एस. आर. नावंदर यांनी दोघांना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred bribe in pune