पुण्यातील पाचशे जणांना दोनशे कोटींचा चुना लावून शेठ झाला फरार

जनार्दन दांडगे
Sunday, 20 September 2020

बेकायदा भिशीत गुंतवणूकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका 
नामांकित व्यापाऱ्याने लोणी काळभोर, उरुळी कांचन, हडपसरसह पूर्व हवेलीमधील पाचशेहून अधिक "बड्या" गुंतवणुकदारांकडून दोनशे कोटीहून अधिक रुपयांची माया गोळा करुन, आपल्या कुटुबिंयासह उरुळी कांचन येथून धूम ठोकल्याने पूर्व हवेलीत एकच खबळबळ उडाली आहे. 

लोणी काळभोर (पुणे) : बेकायदा भिशीत गुंतवणूकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका 
नामांकित व्यापाऱ्याने लोणी काळभोर, उरुळी कांचन, हडपसरसह पूर्व हवेलीमधील पाचशेहून अधिक 
"बड्या" गुंतवणुकदारांकडून दोनशे कोटीहून अधिक रुपयांची माया गोळा करुन, आपल्या कुटुबिंयासह उरुळी कांचन येथून धूम ठोकल्याने पूर्व हवेलीत एकच खबळबळ उडाली आहे. उरुळी कांचन व परीसरात "शेठ" या टोपन नावाने फेमस असलेला भिशी चालक व्यापाऱी कुटुंबिंयासह महिनाभरापासून फरार झाला आहे. शेठचा पाचशेपैकी काही ठराविक गुंतवणुकदारांशी सध्या फोनवरुन संपर्क होत असला तरी, महिनाभऱापूर्वी शेठने बोऱ्याबिस्तारा आवळून पलायन केल्याने उरुळी कांचन व आसपासच्या गावातील पाचशेहून गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान "शेठ"च्या विरोधात उरुळी कांचन गावातील कांही गुंतवणुकदारांनी लोणी काळभोर पोलिसात लेखी स्वरुपात तक्रार दिली असली तरी, शेठकडे गुतंवलेला कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा पोलिसांना कसा दाखवायचा या भितीने गुंतवणुकदारांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. यामुळे दोनशे कोटीहून अधिक रकमेचा गंडा घातला असला तरी, गुंतवणुकदारांनी शेठच्या विरोधात गुन्हा मात्र दाखल करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एका नामांकित रस्त्यावर शेठचे कृषी क्षेत्राशी निगडीत वस्तुचे मोठे दुकान आहे. उरुळी कांचन व परीसरात सर्वप्रथम भिशी सुरु करणाऱ्या एका नामांकित व्यावसायिकांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाल्यावर शेठनी भिशी सारख्या गोरख धंद्यात हातपाय पसरले होते. प्रारंभी महिन्याला हजार रुपयांपासून सुरु केलेली भिशी लॉकडाऊनच्या काळात काही लाखांच्या घऱात व बारा, वीस ते तीस महिन्याच्या काळापर्यंत पोचली होती. सुरुवातीच्या काळात भिशीचा लिलाव होताच, भिशीचे पैसे त्वरीत मिळत असल्याने उरुळी कांचनच नव्हे तर हडपसर, लोणी काळभोर पर्यंतच्या अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी व व्यावसायिकांनी लाखो रुपयांच्या भिशा शेठकडे लावल्या होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र लॉकडाऊनपुर्वी भिशी उचलणाऱ्यांनी, लॉकडाऊन सुरु होताच भिशीचा हफ्ता वेळेवर देण्यास टाळाटाळ सुरु केल्याने शेठचा बाजार उठण्यास सुरुवात झाली. भिशीची हप्ते अनेक जण टाळत असल्याने, भिशीच्या लिलावानंतर पैसे देण्यास विलंब वाढताच शेठनी कुंटुंबाला उरुळी कांचनमधील राहत्या घरी सोडून महिनाभऱापूर्वी उरुळी कांचन येथून धूम ठोकली. मात्र पंधरा दिवसापूर्वी शेठच्या पत्नीला कोरोना झाल्याने, शेठच्या पत्नीला उरुळी कांचन परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, शेठनी रातोरात येऊन, पत्नी व मुलांना घेऊन अज्ञातस्थळी पळ काढला. शेठ पत्नी व मुलाबाळांसह गायब झाल्याचे समजताच, गुंतवणूक दारांमध्ये चलबिचल सुरु झाली होती. यातून काही जणांनी उरुळी कांचन पोलिस चौकीत फसवणुकीची लेखी तक्रार दाखल केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान शेठकडे पैसे थकलेल्यापैकी एका बड्या गुंतवणुकदारांने नाव न छापन्याच्या अटीवर सकाळशी बोलताना सांगितले की, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील अनेक मातब्बर गुतंवणुकदारांनी पन्नास लाखापासून ते दहा कोटी रुपयापर्यंत भिशीत गुंतवणूक केलेली आहे. मात्र, भिशीतील रक्कम पूर्णपणे रोख व बेहिशेबी असल्याने, गुंतवणुकदारांची तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी अवस्था झाली आहे. पूर्व हवेली व दौंड तालुक्यातील पाचशेहून अधिक गुंतवणूकदारांचा हिशोब केल्यास, शेठने घातलेल्या गंड्याची रक्कम अडीचशे कोटीच्या आसपास असण्याची शक्यता आहे. शेठच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत गुंतवणूकदारांत चर्चा सुरु असुन, पुढील कांही दिवसात गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. 

शेठच्या विरोधात फसवणुकीच्या तक्रारी आलेल्या आहेत, लोणी काळभोर पोलिसांची कबुली...

दरम्यान याबाबत बोलतांना लोणी काळभोर पोलिसांच्या अखत्यारीमधील उरुळी कांचन पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवण चौधरी म्हणाले, भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका नामांकित व्यापाऱ्याने लोणी काळभोर, उरुळी कांचन, हडपसरसह पूर्व हवेलीमधील अनेकांना गंडा घातल्याची चर्चा पोलिसांनाही समजली आहे. मात्र नेमकी किती रकमेची फसवणूक झाली याबाबत आत्ताच सांगता येणार नाही. शेठच्या विरोधात उरुळी कांचन पोलिस चौकीत कांही गुंतवणुकदारांच्या तक्रारीही आलेल्या आहेत. मात्र फसवणूक झालेले गुंतवणुकदार गुन्हा दाखल करण्यास तयार नसल्याने, पुढील कारवाई करणे अवघड बनले आहे. याबाबत वरीष्ठांशी चर्चा चालू असून, पुढील एक दोन दिवसात प्राथमिक तपास करुन शेठच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred people cheated in Pune