नोकरीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

देश-परदेशात नोकरी लावण्याचा बहाणा करून बेरोजगारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना शहरामध्ये घडल्या आहेत. त्यापैकी खडकी येथील तरुणाची साडेतीन लाखांची, तर वारजे येथे तिघांची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खडकी व वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पुणे - देश-परदेशात नोकरी लावण्याचा बहाणा करून बेरोजगारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना शहरामध्ये घडल्या आहेत. त्यापैकी खडकी येथील तरुणाची साडेतीन लाखांची, तर वारजे येथे तिघांची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खडकी व वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत ॲनी वेलांगाणी (रा. मुळा रस्ता, खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यावरून अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व त्यांचा मित्र अमितकुमार बंगेरा हे दोघेही परदेशात चांगली नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्याशी एका व्यक्तीने संपर्क साधून सिंगापूर येथे चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांना पैसे भरण्यास सांगितले.

त्यानुसार दोघांकडून संबंधित व्यक्तीने वेगवेगळी कारणे सांगून साडेतीन लाख रुपये एका बॅंकेच्या खात्यात भरण्यास सांगितले. त्यानुसार दोघांनी पैसे भरले. त्यानंतर त्यांनी नोकरीसाठी संबंधित व्यक्तीला फोन केला, त्या वेळी त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

दरम्यान, वारजे येथील एका कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी श्रीकांत उकिरडे (रा. कात्रज) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींनी तिघांनाही वारजे येथे अस्तित्वात नसलेल्या ऑप्रेटिक टेक्‍नॉलॉजी कंपनीत जावा डेव्हलपर व इतर पदांवर नोकरीचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर तिघांनाही बनावट कागदपत्रे तयार करून दिली. तिघे जण संबंधित कंपनीत गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

महिलेची फसवणूक 
कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची ४५ हजारांची फसवणूक झाली. याप्रकरणी ५१ वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जाहिरातीवर संपर्क साधून दोन लाखांचे कर्ज मागितले. त्यानंतर अनोळखी व्यक्तींनी महिलेस व्हॉटसॲपद्वारे कागदपत्रे मागितली. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ४५ हजार रुपये घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh fraud by job offer crime