पुणे जिल्ह्यात दूध संकलनात 5 टक्के वाढ; अतिवृष्टीमुळे पुन्हा घटीचा धोका

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

दरवर्षी उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या प्रमाणात घट होत असते. त्याचा थेट परिणाम हा दूध उत्पादनावर होत असतो. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात पाच ते दहा टक्‍क्‍यांनी दूध उत्पादन घटत असते. मात्र पाऊस पडल्यानंतर हिरवा चारा निर्माण झाल्याने, ते पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. परंतु यंदा पाऊस लांबल्याने, पावसाळ्यातील पहिल्या दोन महिन्यातही दूध उत्पादनात फारशी वाढ होऊ शकली नव्हती. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस उत्पादनात वाढ होण्यास सुरवात झाली होती. त्यानुसार ऑक्‍टोबरच्या मध्यापर्यंत चांगली वाढ झाली होती.

पुणे : पावसामुळे हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढल्याने, जिल्ह्यातील दैनंदिन दूध संकलनात सुमारे पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यानुसार जिल्ह्यात आता उन्हाळ्यापेक्षा प्रतिदिन सुमारे एक लाख लिटरने जास्त दूध संकलन वाढले आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ही वाढ अल्प काळ ठरण्याचा धोका निर्माण भीतीही दूध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यात विविध दूध संस्थांकडे मिळून दररोज सुमारे 20 लाख लिटर दूध संकलन होत असते. त्यात आता आणखी सुमारे एक लाख लिटरची भर पडली आहे. यानुसार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) दैनंदिन दूध संकलनात प्रतिदिन 10 हजार लिटरने वाढ झाली आहे. यामुळे कात्रज डेअरीचे दूध संकलन आता दोन लाख पंधरा हजार लिटरवर गेले असल्याचे या दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले.

दरवर्षी उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या प्रमाणात घट होत असते. त्याचा थेट परिणाम हा दूध उत्पादनावर होत असतो. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात पाच ते दहा टक्‍क्‍यांनी दूध उत्पादन घटत असते मात्र, पाऊस पडल्यानंतर हिरवा चारा निर्माण झाल्याने, ते पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. परंतु यंदा पाऊस लांबल्याने, पावसाळ्यातील पहिल्या दोन महिन्यातही दूध उत्पादनात फारशी वाढ होऊ शकली नव्हती. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस उत्पादनात वाढ होण्यास सुरवात झाली होती. त्यानुसार ऑक्‍टोबरच्या मध्यापर्यंत चांगली वाढ झाली होती. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे चाऱ्याचे झालेले नुकसान, दुभत्या जनावरांना पावसामुळे अचानक उद्‌भवणारे आजार आदी बाबींमुळे पुन्हा घट होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे सोनई दूध संघाचे संस्थापक दशरथ माने यांनी सांगितले.

जिल्ह्यात बारामती, इंदापूर या दोन तालुक्‍यांचे स्वतंत्र दूध संघ आहेत. शिवाय जिल्ह्यातील अन्य 11 तालुक्‍यांसाठी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी), सोनई, डायनामिक्‍स, पराग, ऊर्जा आदी प्रमुख दूध संस्था शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत असतात.

दूध संकलन दृष्टिक्षेपात
- उन्हाळ्यातील प्रतिदिन एकूण संकलन --- 20 लाख लिटर
- सध्याचे प्रतिदिन संकलन --- 21 लाख लिटर
- सर्वाधिक संकलन करणारी दूध संस्था --- सोनई
- कात्रज डेअरीच्या संकलनातील वाढ --- 10 हजार लिटर
- कात्रजचे सध्याचे प्रतिदिन संकलन --- 2 लाख 15 हजार लिटर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A five percent increase in milk collection in Pune District but risk of falling again due to heavy rainfall