बारामतीत पावसाचे तांडव, अनेकांच्या घरात पुराचे पाणी

undawad
undawad

उंडवडी (पुणे) : बारामतीच्या जिरायती भागात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने रात्रभर लोकांचे हाल झाले. खरीप हंगामातील पिकांचेही या पावसाने नुकसान झाले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
सातत्याने दुष्काळ आणि पाणी टंचाईशी सामना करणाऱ्या या गावांना यंदा वरूणराजाने कृपा केली आहे. गेल्या महिन्यापासून पावसामुळे या भागातील ओढे नाले, सिमेंट बंधारे माती नाला बांध, ताली, तुडुंब भरुन वाहत आहेत. या पावसामुळे उंडवडी सुपे  येथे अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने प्रपंच उपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या व खराब देखील झाल्या. तसेच, कुटुंबाचे रात्रभर हाल झाले.  उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी कडेपठार व जळगाव सुपे या गावातील ओढ्यांना रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. 

यंदा समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, भूईमूग, मूग, मका व इतर चारा पिके व भाजी पिके घेतली आहेत. बाजरीची पिके अंतिम टप्यात आली असून, बहुतांशी शेतकऱ्यांची बाजरीची काढणी व खुडणी सुरु आहे. मात्र, रविवारी रात्री अचानक आठच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. सुरवातील वादळी वारे आणि नंतर आकाशात विजांचा कडकडाटसह पाऊस तब्बल दोन तास मुसळधार पाऊस पडला. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेल्या बाजरी पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी बाजरीची कणसे काढून शेतात ठेवली होती, ती पुराच्या पाण्यात वाहून गेली. हा पाऊस म्हणजे ढगफुटी झाली आहे, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

ओढ्याला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणचा रस्ता खचला व काही ठिकाणचे पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सोनवडी ते उंडवडी सुपे रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. तसेच, जळगाव सुपे ते कारखेल या रस्त्यावरील पूल पाण्यामुळे वाहून गेला आहे. अंजनगाव येथील बारवनगरचा पूल पुरामुळे वाहून गेला आहे. जळगाव सुपे येथील विठ्ठल सोपानराव वाघ यांच्या शेतात जाणार्‍या ओढ्यावरील पूल वाहून गेला आहे. तसेच, बऱ्हाणपूर- अंजनगाव रस्त्यावरील नव्याने झालेला पूल वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तर, काही ठिकाणी अजूनही रस्त्यावर व पुलावर पाणी आहे. सोनवडी सुपे येथील पर्जन्यमापक यंत्रात 131 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

दरम्यान, आज सकाळी बारामतीचे प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी या नुकसानग्रस्त गावांचा दौरा करुन नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेतली. त्यांनी गावकामगार तलाठ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व वाहून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

दुष्काळग्रस्तांना पुराचा फटका
गेल्या वर्षापर्यंत दुष्काळाच्या झळा सोसत पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहत असलेल्या भागाला यंदा सर्वदूर पावसाने वेढा टाकला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष दुष्काळच्या झळा सोसत असलेल्या ग्रामस्थांना आता तीस ते पस्तीस वर्षात पहिल्यांदाच पुराच्या पाण्याचा फटका देखील सोसण्याची वेळ आली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com