
Flower Exhibition : पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये 2 वर्षानंतर पुष्पप्रदर्शन
घोरपडी - एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे २५ ते २९ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन २५ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे व विश्वस्त अनुपमा बर्वे यांनी दिली .
पुष्पप्रदर्शन २५ जानेवारीला दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत आणि २६ ते २९ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा रविवार २२ जानेवारीला आयोजित करण्यात आल्या आहेत.
प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते येणार आहेत. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल असणार आहेत.
यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविध झाडे, वेली नटलेले एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून लवकरच पुणेकरांना यांचा आनंद घेता येणार आहे.