मुलांऐवजी गवताने "फुलले' मैदान 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

 औंधमधील इंदिरा गांधी शाळा बंद असल्याने परिसर विद्रूप; डासांमुळे नागरिक त्रस्त

पुणे ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद असल्याने येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी शाळेच्या मैदानावर काटेरी झाडाझुडपांसह गवताची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने परिसर विद्रूप दिसत असून, डास, चिलटांच्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यामुळे मैदान स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिक सुशील लोणकर यांच्यासह क्रिडाप्रेमींकडून केली जात आहे. 

कोरोना संकटात महापालिका प्रशासन गुंतले गेले असल्याने गेल्या काही महिन्यांपासून या मैदानाकडे महापालिकेकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कचरा साठून मैदानावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास मैदानाच्या परिसरातील नागरिकांना होत आहे. 

विशेष म्हणजे औंधगाव व परिसरातील हे एकमेव मोठे मैदान असून सर्व क्रीडाप्रेमी, खेळाडू यांनी या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील लोणकर यांनी याविषयी सहायक आयुक्त जयदीप पवार यांना नुकतेच निवेदन देऊन मैदानाची साफसफाई करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मैदान बंद असल्याने याकडे दुर्लक्ष झाले असले तरीही आता या मैदानाच्या देखभालीकडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. 

सध्या मैदानावर सहा फुटांपर्यंत गवताची झालेली वाढ व डासांचा प्रादुर्भाव पाहता शेजारील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच त्रस्त झालेल्या नागरिकांना डासांच्या वाढीमुळे आजार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कोरोना प्रादुर्भाव होण्यापूर्वीच या मैदानावर नवीन माती टाकून हे मैदान विकसित करण्यात आले होते, परंतु मागील काही महिन्यांत मैदान बंद असल्याने व पावसाच्या पाण्यामुळे गवताची भरमसाट वाढ झाली. याचा परिणाम मैदानाच्या विद्रुपतेत झाला आहे. 

मैदानातील ओलसरपणा पाहता येथे जेसीबी किंवा तत्सम यंत्रांच्या साह्याने गवत काढणे अवघड आहे, त्याऐवजी औषध फवारणी करुन हे गवत नष्ट करुन काढले जाईल. यासाठी ओलसरपणा कमी झाला की हे काम तातडीने केले जाईल. -जयदीप पवार, सहायक आयुक्त, 
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower field with grass insted of children