ठरलं : पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

पुलाच्या ठिकाणी दुहेरी उड्डाणपूल 
हे पूल पाडून त्या ठिकाणी दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी एक पूल हा फक्त मेट्रो प्रकल्पासाठी असणार आहे. तर दुसऱ्या पुलाचा बीआरटी आणि अन्य खासगी वाहनांसाठी वापर होणार आहे. तर त्या खालील रस्त्यावरून अन्य वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाकडून येत्या दोन दिवसात राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळातच पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. संपूर्ण मेट्रो मार्ग हा इलेव्हेटेड असणार आहे. हे काम बीओटी तत्त्वावर टाटा- सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. पीएमआरडीएने हाती घेतलेली मेट्रो पुणे महापालिकेच्या हद्दीत पुणे विद्यापीठ चौकातून गणेशखिंड रस्त्याने जातो. या मार्गावर असलेले तिन्ही उड्डाणपूल हे अडचणीचे ठरत आहे. हे उड्डाणपूल न पाडता मेट्रो मार्गात बदल केला, तर शासकीय आणि खासगी जागा ताब्यात घ्याव्या लागत आहे. त्यातून प्रकल्पाचा खर्च देखील वाढू शकतो. त्याऐवजी हे उड्डाणपूल पाडावेत, असा विचार पुढे आला होता. तीन महिन्यांपूर्वी गणेशखिंड रस्त्यावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात या उड्डाणपूलासंदर्भात पवार यांनी वक्तव्य केले होते. 

"लिव्ह इन रिलेशनशिप'"मध्ये राहणाऱ्या जोडप्यात लॉकडाऊनमुळे उडाले खटके; मग...!

गेल्या काळात काही चुका झाल्या. त्या शंभर वर्ष तशाच ठेवल्या पाहिजे, असे नाही. तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. या रस्त्यावरील उड्डाणपूल पाडून खाली रस्ता, त्यावर दोन मजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे, असे पवार यांनी स्पष्ट केला होते. दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यामध्ये हा उड्डाणपूल पाडण्यासंदर्भातील सूचना केल्या होत्या. 

यासंदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘उड्डाणपूल पाडण्यास पालकमंत्री अजित पवार यांनी मान्यता देऊन तसा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसात तो राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.’’ 

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना पालिका बजाविणार नोटीस

आता चूक सुधारणार
गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल हे एमएसआरडीसीकडून २००६ मध्ये बांधण्यात आले आहेत. या पुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी नियोजन चुकल्याची कबुली देण्यात आली होती. एकेरी ऐवजी दुहेरी वाहतुकीसाठी ते उभारणे आवश्‍यक होते, असे तज्ञांचे म्हणणे होते. ही चूक आता मेट्रो प्रकल्पाच्या निमित्ताने सुधारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The flyover on Ganeshkhind road will be demolished for the metro project