लोककला ही मातीतील कला - पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पिंपरी - "लोककला ही जीवनातील तत्त्वज्ञान व गोडवा मांडणारी मातीतील कला आहे,'' असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. 

पिंपरी - "लोककला ही जीवनातील तत्त्वज्ञान व गोडवा मांडणारी मातीतील कला आहे,'' असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. 

चिंचवडमध्ये आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. ते म्हणाले, ""कोणतीही कला उत्स्फूर्तपणे येत असते. तो अंतर्मनाचा आविष्कार असतो. लोककला हा संवादाचा आत्मा आहे. मनाला रुंजी घालण्याचं काम ती करते. लोककला जगलेले बालगंधर्व आणि पठ्ठे बापूराव ही महाराष्ट्राला पडलेली दोन स्वप्ने आहेत. मनातलं गाणं जनात जातं आणि जनातलं आपल्या जगण्यात येतं तेव्हा लोककला निर्माण होते. चंद्राच्या कलांप्रमाणे ती असते. पिंपरी-चिंचवडचा झेंडा सतत उंच राहण्यासाठी मल्लकला व लोककला वाढविली पाहिजे. त्यासाठी लोककलावंतांच्या मागे कोणी तरी उभं राहिलं पाहिजे. ते काम महापालिका करीत आहे, हे स्वागतार्ह आहे.'' 

महापौर नितीन काळजे म्हणाले, ""लोककलावंतांना महापालिकेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. चांगले कलाकार घडण्यासाठी विविध स्पर्धा आपण घेत असतो.'' 

भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ""लोककलेचा सूर्य कधीच मावळणारा नाही. सर्व प्रांतातील लोक शहरात राहतात. त्यांच्या लोककला ते जोपासत आहेत. क्रांतिवीर आणि संतांच्या विचारांपासून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. म्हणूनच लोककला संमेलन भरविले आहे.'' 

लोककलावंतांचा गौरव 
लोककला संमेलनाच्या उद्‌घाटनानंतर श्रीनिवास पाटील आणि डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते लोककलावंतांचा गौरव करण्यात आला. यामध्ये लीला गांधी (जीवन गौरव), प्रभाकर मांडे (लोककला साहित्य गौरव), वसंत अवसरीकर (सोंगाड्या), संजीवनी मुळे नगरकर (लोकनाट्य), पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तन), बापूराव भोसले (गोंधळी), मुरलीधर सुपेकर (शाहीर), सोपान खुडे (साहित्य), प्रतीक लोखंडे (बालशाहीर) यांचा समावेश होता. गांधी यांना दिलेल्या जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये रोख, गौरव चिन्ह व शाल, असे होते. मांडे यांचा पुरस्कार त्यांच्या पुतण्यांनी स्वीकारला. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Folk art is the art of soil - Patil