esakal | श्रीनाथा, तूच सांभाळ आता! संकटमुक्तीसाठी लोककलाकारांचे साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

 folk artists are in crisis due to mini lock down corona

कोरोना महामारीमुळे सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमावर निर्बंध लादण्यात आले आहेत. याचा फटका लग्नकार्यानंतर जागरण गोंधळ व गावातील जत्रेमध्ये तमाशा करणारे लोक कलाकार यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. उपजिविकेसाठी दुसरे साधन नसल्याने जगायचे कसे असा प्रश्न या कलाकारांपुढे पडला आहे. 

श्रीनाथा, तूच सांभाळ आता! संकटमुक्तीसाठी लोककलाकारांचे साकडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोथरुड : कोरोना व्हायरस पुण्यात आला, सुटलय वादळ हो श्रीनाथा मागणं माझं, कर भक्ताचा सांभाळ अशा शब्दात नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या लोककलाकारांनी कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटातून वाचवण्यासाठी श्रीनाथा चरणी आळवणी केली आहे. 

कोरोना महामारीमुळे सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमावर निर्बंध लादण्यात आले आहेत. याचा फटका लग्नकार्यानंतर जागरण गोंधळ व गावातील जत्रेमध्ये तमाशा करणारे लोक कलाकार यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. उपजिविकेसाठी दुसरे साधन नसल्याने जगायचे कसे असा प्रश्न या कलाकारांपुढे पडला आहे. 

जागरण गोंधळ, भारुड या लोकभक्तीच्या विधीतून आपली उपजीविका भागविणा-या लोककलाकारांवर कोरोना निर्बंधामुळे उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभरापासून कार्यक्रम बंद असल्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न या लोककलाकारांपुढे उभा राहीला आहे. या कलाकारांना उपजिविकेचे पर्यायी साधन नाही. तसेच सरकारने सुध्दा कोणतेही पॅकेज जाहीर केलेले नाही. त्यामुळे आम्ही कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न पडला. त्यामुळे या संकटातून आमचा नाथच आम्हाला सोडवेल अशी आशा सुभाष दत्तात्रय माळवे यांनी व्यक्त केली. माळवे हे जागरण गोंधळ, भारुड, तमाशा, जलसा यामध्ये गायक, वादक म्हणून काम करतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुभाष माळवे म्हणाले की, ''गेली सत्तावीस वर्षापासून जागरण गोंधळाचे कार्य मी करतो. पारंपारीक वाद्यावर आम्ही हे विधी करायचो. आता इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचा वापरही सुरु झाला आहे. महाराष्ट्राची लोकधारा, ऑर्केस्टा आदी मध्ये माझा सहभाग होता. माझा संसार अतिशय सुखाने सुरु होता. पण 2020 मध्ये कोरोना आला आणि तोंडचा घास पळून गेला.''

नारायण शिंदे हे तमाशात नाचाचे काम करायचे. जागरण गोंधळ हे त्यांच्या उपजिविकेचे साधन. पायाला मार लागल्याने व वय झाल्यामुळे आता इतर कामे करु शकत नाहीत. त्यातच सारे वर्ष लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंधात गेल्यामुळे जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. 

पुण्यात ऑक्सिजन न मिळण्याच्या तक्रारी, जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 टोल फ्री नंबर जाहीर
तमाशा मध्ये सोंगाड्याची भूमिका करणारे दिलीप अहीरे हे जागरण गोंधळ, कलापथकात काम करतात. तर तमाशा मध्ये गायकी, बतावणीचे काम करणारे शिवाजी माळवे हे ऑर्केस्ट्रा, लोकधारा, जागरण गोंधळ यामध्ये काम करतात. या दोघांनी सांगितले की खर्चाचा ताळमेळ कसा लावायचा हा प्रश्न आज आम्हा प्रत्येक कलाकारापुढे आहे. मुरळी म्हणून काम करणा-या महिलांना धुण्या भांड्याची पण कामे मिळेना. त्यामुळे त्यांचे होणारे हाल पाहवत नाहीत. सरकारने या सर्वाचा विचार करुन लोककलाकारांना आधार द्यावा.

loading image