शहरात ६५ टक्के रस्ते पदपथाविना

पीतांबर लोहार
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पिंपरी - शहरातील ६५ टक्के रस्ते पदपथविरहित असून वेगवेगळे अडथळे, असमान रचना, कचरा, राडारोडा, दुरवस्था, विक्रेत्यांची अतिक्रमणे, अशा गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना धोकादायकरीत्या मार्गक्रमण करावे लागत असल्याचे वास्तव पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. 

पिंपरी - शहरातील ६५ टक्के रस्ते पदपथविरहित असून वेगवेगळे अडथळे, असमान रचना, कचरा, राडारोडा, दुरवस्था, विक्रेत्यांची अतिक्रमणे, अशा गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना धोकादायकरीत्या मार्गक्रमण करावे लागत असल्याचे वास्तव पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. 

महापालिकेसह नवनगर विकास प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या माध्यमातून शहराचा विकास सुरू आहे. नागरिकांना पायाभूत व मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची असून, सुनियोजित शहर विकसित करण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिक विकासासाठी नियोजन केले जाते. मात्र, रस्त्यांच्या विकासाची संपूर्णतः जबाबदारी महापालिका व प्राधिकरणाची आहे. त्यांच्या जोडीला आता पीएमआरडीए आले आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये समन्वय साधून सुनियोजित विकासाचे ध्येय ठरविले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीएने शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केले आहे, तर स्मार्ट सिटीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर भागाची निवड केली आहे. गेल्या वर्षभरापासून तिथे स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. मात्र, दोन्ही संस्थांच्या सर्वेक्षणानुसार रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय असून, त्यात एकसमानता व सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे.

सर्वेक्षणातील निष्कर्ष
 अडथळे : पदपथांचे निखळलेले पेव्हिंग ब्लॉक. झाडांच्या तुटलेल्या संरक्षक जाळ्या. सेवा वाहिन्यांच्या केबल्स उघड्यावर पडलेल्या. वेगवेगळ्या कारणांसाठी खोदलेले पदपथ. काही ठिकाणी काँक्रिट किंवा लोखंडी बार लावून उभारलेले अडथळे. 

 असमान : बहुतांश ठिकाणी उंच-सखलपणा. काही इमारतींमध्ये वाहने जाण्यासाठी उतार केलेले. काही ठिकाणी खोलगट भाग आहे. 

 धोकादायक : रस्त्यावर किंवा पदपथावर कचरा, राडारोडा, बांधकाम साहित्य विटा, वाळू, खडी, स्टिल बार आदी ठेवलेले. दुरुस्तीचा अभाव. चालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने पादचारी व सायकलस्वारांना धोका. 

 अतिक्रमणे : अनियोजित पद्धतीने हॉकर्सची व्यवस्था. रस्त्यात किंवा पदपथावर पथारी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण. व्यापाऱ्यांनी दुकाने वाढविलेली. पार्किंग व पदपथांवर वस्तू मांडलेल्या. 

 दुष्परिणाम : पादचाऱ्यांसाठी रस्ते असुरक्षित असून चालणे धोकादायक आहे. पादचारी रस्त्यावरून चालत असतात. वाहने रस्त्यांवर उभी केली जात असल्याने अरुंद रस्ते आणखी अरुंद होतात. 

समाविष्ट गावांत नवीन रस्ते निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक व पदपथ असतील. अनियोजित पद्धतीने विकसित झालेल्या गावठाण व तत्सम भागातील रस्ते सुनियोजित पद्धतीने विकसित करण्याचे नियोजन आहे. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

दृष्टिक्षेपात रस्ते
 एकेरी : २२ टक्के
 दुहेरी : २५ टक्के
 तिहेरी : ४ टक्के
 चौपदरी : १३ टक्के 
 सहापदरी : ८ टक्के
 मध्यवर्ती : २८ टक्के

रस्त्यांची टक्केवारी
 पदपथ नसलेले रस्ते : ६५ टक्के
 एका बाजूस पदपथ : १२ टक्के
 दोन्ही बाजूस पदपथ : २३ टक्के

Web Title: Foothpath Encroachment