दिवाळी फराळाच्या निमित्ताने इच्छुकांची मोर्चेबांधणी | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इच्छुकांची मोर्चेबांधणी

हडपसर : दिवाळी फराळाच्या निमित्ताने इच्छुकांची मोर्चेबांधणी

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर : महानगरपालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छुक कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चर्चेत येण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागला आहे. "दिवाळी फराळ' हा असाच एक कार्यक्रम गेल्या आठवडाभरापासून मोठ्याप्रमाणात अशा इच्छुकांच्या दारात रंगताना दिसत आहे.

काही मोजके पुढारी सोडले तर कधीही दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन न करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी मात्र अवर्जून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आपापल्या प्रभाग रचनेचा अंदाज बांधून झाडून सर्व मतदारांना निमंत्रण दिले जात आहे. नवीन समाविष्ट गावांमधील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये तर असे कार्यक्रम आयोजित करण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसत आहे.

हेही वाचा: नांदेड : दंगल प्रकरणी ३५ जणांना अटक

मतदार तर खूष झालाच पाहिजेच मात्र, त्याचबरोबर पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही आपल्या लोकप्रियतेचा तसेच ताकदीचा अंदाज यावा, यादृष्टीने अनेक इच्छुकांनी फराळाचे नियोजन केले होते. रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून हडपसर व पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात सुमारे तीस पस्तीस ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. या कार्यक्रमाला हजेरी लावताना मात्र प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागली.

या प्रत्येक ठिकाणी फराळाबरोबरच चर्चा रंगली ती मात्र प्रभाग रचना कधी, तो कसा असेल, कोणता भाग कोठे जोडला जाईल, कोणत्या पक्षातून कोण इच्छुक आहेत, उमेदवारी नेमकी कुणाला मिळेल, कोण कुठल्या नेत्या जवळचा, उमेदवारी न मिळाल्यास कोण कोठे जाईल, कोण अपक्ष राहिल आणि किती पैसे खर्च होतील या गोष्टींचीच.

फराळासाठी अमुक अमुक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित मतदारही आले, असा विचार करीत आयोजक इच्छुकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. फुरसुंगी, मांजरी बुद्रुक या नव्याने समाविष्ट गावांमध्ये अशा इच्छुकांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याचे फराळ कार्यक्रमातून दिसून आले. एकूणच या दिवाळी फराळ कार्यक्रमाने आगामी महानगरपालिका निवडणूकीचे बिगुल फुंकले असल्याचे अवर्जून पाहवयास मिळाले.

loading image
go to top