भाजपच्या माजी नगरसेवकास खंडणी मागणाऱ्यास तेलंगणा राज्यातुन अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास बिबवेवाडी पोलिसांनी तेलंगणातून अटक केली.

भाजपच्या माजी नगरसेवकास खंडणी मागणाऱ्यास तेलंगणा राज्यातुन अटक

पुणे - भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास बिबवेवाडी पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. त्यास तीन ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे

इम्रान समीर शेख (रा. 38, विकासनगर, घोरपडी गाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ (रा. लष्कर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिसाळ हे भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर आहेत. भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर व माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना 18 ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयातील जनसंपर्कासाठी ठेवलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करुन तसेच मेसेज करुन गुगल पे द्वारे खंडणी मागण्यात आली होती. पैसे न दिल्यास मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामाध्ये संबंधित व्यक्ती हा तेलंगणा राज्यातील कामारेड्डी येथे लपून बसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने त्याला तेलंगणा येथे जाऊन ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध चंदन नगर पोलिस ठाण्यात ही एक गुन्हा दाखल आहे. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तो आयटी पार्कमधील एका कॉलसेंटरमध्ये कामाल आहे, अशी माहिती परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे, शाम लोहोमकर, सतीश मोरे, तानाजी सागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.