
बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणातील माजी आयपीएस अधिकाऱ्याला सायबर पोलिसांनी फसवणुकीच्या आणखी एका गुन्ह्यात अटक केली आहे.
माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांना न्यायालयीन कोठडी
पुणे - बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) (Bitcoin) या आभासी चलन फसवणूक प्रकरणातील (Currency Cheating Case) माजी आयपीएस अधिकाऱ्याला (IPS Officer) सायबर पोलिसांनी (Cyber Police) फसवणुकीच्या आणखी एका गुन्ह्यात (Crime) अटक केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्यांची दोन मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) असे या माजी आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. के.पी.एम.जी कंपनीचे आनंदा प्रदीपकुमार मंडल (वय ४४, रा. मारव्हल ब्रिसा, सार्इ चौक, बालेवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील हे फिर्यादी यांच्या के.पी.एम.जी. या कंपनीमध्ये पगारदार भागीदार या पदावर कार्यरत होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा क्रमांक २८/२०१८ आणि निगडी पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १८१/२०१८ या गुन्ह्यातील आरोपीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामधील डेटा कंपनीचे ताब्यात होता. तेव्हा कंपनीच्या संमतीशिवाय पाटील यांनी २१ आॅगस्ट २०१८ रोजीच्या वर्क ऑर्डरच्या व्याप्तीच्या पलीकडे जाऊन कंपनीने घालून दिलेल्या सर्व नियम, अटीशर्ती व धोरणांचे उल्लंघन करून तो डेटा स्वतःच्या संगणकावर घेऊन कंपनीचा विश्वासघात केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
अटक झाल्यानंतर पाटील यांना मंगळवारी (ता. २६) न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीने चोरलेला डेटा जप्त करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. आरोपीच्या वतीने ॲड. रोहन नहार यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने पाटील यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या गुन्ह्यात पाटील यांना जामीन मिळावा यासाठी बुधवारी अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. नहार यांनी दिली. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.
Web Title: Former Ips Ravindranath Patil Remanded In Judicial Custody Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..