
जुन्नर - जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला, अशी चर्चा रंगली. मात्र, त्यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे दांगट यांच्या प्रवेशाबद्दल सूर उमटत आहे.
बाळासाहेब दांगट हे सन १९९० व सन १९९५ मध्ये जुन्नर तालुक्याचे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी होते. त्यांचा सन २००४ मध्ये पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चा रंगली आहे. त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला तर तालुक्यातील शिवसेनेला बळकटी मिळेल, अशी चर्चा आहे.
दरम्यान, याबाबत दांगट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. बंधू बाजीरावशेठ दांगट यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी, ‘बाळासाहेबांचे काय चालले आहे?’ अशी विचारणा केली होती. दांगट व ठाकरे परिवाराचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे ‘मातोश्री’वर जाऊन आम्ही त्यांना भेटलो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ठाकरे यांच्या भेटीवेळी बाळासाहेब दांगट यांच्यासोबत बाजीराव दांगट, नीलेश दांगट व बबनराव थोरात आदी उपस्थित होते.