पुण्यात माजी महापौरांना रुग्णालयात बेड तर नाहीच स्मशानभूमीतही मिळाली नाही जागा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात बेड मिळण्यासाठी जशा अडचणी आल्या तसंच निधनानंतर एकबोटे यांच्या अंत्यसंस्कारातही अनेक अडचणी आल्या.

पुणे - पुण्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून कोविड सेंटरमध्ये बेड मिळत नसल्यानं काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. दत्ता एकबोटे 84 वर्षांचे होते.  एकबोटे यांच्या मोठ्या मुलीचे आणि मुलाचेसुद्धा कोरोनामुळे निधन झाले आहे. 

एकबोटे यांना कोरोना झाला असल्याचं समजल्यानंतर अनेक रुग्णालयांशी संपर्क केला मात्र बेड उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथेही योग्य उपचार मिळावेत यासाठी गिरीश बापट, अजित पवार यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर सुविधा मिळाल्या पण एकबोटे यांची प्रकृती खालवली होती. त्यातच त्यांचे निधन झाले. 

कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात बेड मिळण्यासाठी जशा अडचणी आल्या तसंच निधनानंतर एकबोटे यांच्या अंत्यसंस्कारातही अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला त्यांचे पार्थिव कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले होते. तिथं जागा नसल्यानं येरवडा इथं नेलं. तिथून पुन्हा कोरेगाव पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे वाचा - पुणेकरांना कोरोनाबाबत दिलासा नाहीच; पुन्हा आढळले साडेतीन हजारावर रुग्ण

गरीबांचे नेते
गरीबांचे लढाऊ नेते अशी त्यांची ओळख होती. समाजवादी विचारांचे असलेल्या दत्ता एकबोटे यांनी समाजवादी पक्ष, जनता पक्षा आणि त्यानंर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. कष्टकऱ्यांसाठी संघर्ष करताना त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला आहे. आणीबाणीच्या काळात ते स्थानबद्ध होते. विडी कामगारांसाठी गोल्फ क्लब आणि खराडी इथं शेकडो घरांची उभारणी केली.

पुण्यात कोरोनाचा कहर
जिल्ह्यात बुधवारी एका दिवसात ३ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या चोवीस तासांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७७ हजार २८२,  कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ६३८ तर रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४ हजार २५७ झाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former mayor datta ekbote passes away due to corona