चीन पुन्हा आक्रमक होण्याची शक्‍यता 

सोमवार, 7 मे 2018

भारत-चीन संबंधातील तणाव निवळण्याचे प्रयत्न वुहान भेटीच्या माध्यमातून झाले. त्या पार्श्‍वभूमीवर चीनमधील घडामोडींचे अभ्यासक, भारताच्या "रिसर्च अँड ऍनालिसिस विंग'चे (रॉ) माजी वरिष्ठ अधिकारी जयदेव रानडे यांच्याशी संतोष शाळिग्राम यांनी नवी दिल्लीत साधलेला संवाद... 

पाकिस्तान या कोसळलेल्या राष्ट्राशी हातमिळवणीमागे चीनचा हेतू काय? 
- चीन आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यात भारताला विरोध हे पाकिस्तानचे धोरण आहे. त्यामुळे भारतावर दबाव ठेवण्याचा एक हेतू. याशिवाय ग्वादारसारखे बंदर, अरबी समुद्र, अफगाणिस्तान आणि मध्य आशियावर चीनला नजरेच्या टप्प्यात ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांची पाकिस्तानला मदत सुरू आहे. 

"चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर' हा महाकाय प्रकल्प चीनच्या मदतीने उभारला जात आहे. त्याबद्दल काय सांगाल? 
- चीनमधील झिनझियांग आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान, गिलगिट-बाल्टीस्तान, पंजाब आणि सिंध प्रांत असा हा प्रकल्प पसरलेला आहे. यातून पाकिस्तानच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल; पण हा प्रकल्प उभारताना चीनने त्यांना फुकट काहीच दिलेले नाही. ते सर्व कर्जरुपाने देत आहेत. त्याचे व्याजही फेडणे पाकला जड जाईल. त्यामुळे या प्रकल्पाला राजकीय स्तर आणि सामान्य नागरिकांकडूनही विरोध होऊ लागला आहे. लष्करे तैयबासारख्या दहशतवादी संघटनादेखील त्याला विरोध करू लागल्या आहेत; पण चीनला त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी हा प्रकल्प हवाच आहे. 

वुहान समिटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीचे भारतासाठी फलित काय? 
- डोकलाम वादामुळे भारत-चीन संबंध तणावपूर्ण होते. तो तणाव निवळण्यास ही भेट मदत ठरेल. जिनपिंग यांनाही त्यांचे सल्लागार शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. चीन मित्र गमावत असल्याची त्यांची भावना आहे. पण या भेटीतून तणाव निवळला तरी परिस्थिती कायम राहणार नाही. संधी मिळताच चीन पुन्हा आक्रमक होऊ शकेल. 

काश्‍मीरमधील दहशतवादी कारवाया, पाकिस्तानकडून वारंवार होणारा शस्त्रसंधीचा भंग, याला उत्तर द्यायला भारत कमी का पडतोय? 
- राजकीय नेतृत्व त्याला कमी पडत आहे. भारताला धक्का लावाल, तर बदला घेऊ, ही इच्छाशक्तीच निर्माण होत नाहीये. इस्राईल, अमेरिका असे धाडस दाखवते, तर भारत का दाखवत नाही? काश्‍मिरात दगडफेक होते, भारतविरोधी घोषणा दिल्या जातात. त्यांच्यावर कारवाई काय तर नजरकैद. त्यांना सैल का सोडले जाते हे समजत नाही. खरं तर अशा कृत्यांमागे कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यांना अटक करून वेगवेगळ्या राज्यांमधील तुरुंगात ठेवा. मग पाहा तिथे कशी शांतता नांदेल. 

दाऊद कुठे आहे, हे जगाला माहीत आहे. पाकिस्तान ते मान्य करीत नाही. का? 
-मुंबई हल्ले, कंदहार अपहरण झाले. त्याला अंडरवर्ल्डची मदत घेण्यात आली. पाकिस्तान भारतविरोधी कारवायांसाठी अंडरवर्ल्डचा पैसा आणि माणसे वापरत असावा. दाऊदही त्याचा भाग असेल. कारण त्याच्या यंत्रणेचे जाळे भारतात पसरले आहे. पाकबाबत दाऊदला आता सर्व माहीत झालेले आहे. त्यामुळे पाकिस्तान कधीच दाऊदला कुणाच्या हाती देणार नाही. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला, तर आयएसआय दाऊदचा घात करेल, ही शक्‍यता नाकारता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former senior officer of the Research and Analysis Wing Jaydev Ranade interview