esakal | पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

बोलून बातमी शोधा

Dr Arun Nigvekar

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचे (वय ७९) दीर्घ आजाराने आज (ता. २३) दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. निगवेकर यांना सात वर्षापूर्वी ब्रेन कॅन्सर झाल्याने त्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या एक वर्षापासून त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांच्यावर घरातच होते. शुक्रवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास त्यांचे हृदय बंद पडल्याने प्राणज्योत मावळली, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

डॉ. निगवेकर हे १९९८ ते २००० या काळामध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यापूर्वी ते विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली. कुलगुरू असताना त्यांनी विद्यापीठ विकास योजना व विद्यार्थी केंद्रित कारभार करण्यावर भर दिला. उच्च शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘नॅक’ संस्थेच्या उभारणीमध्ये डॉ. निगवेकर यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करताना मोलाची कामगिरी बजावली. नॅकच्या उभारणीपासून कामकाजाची पद्धत, नियम याचा मसुदा तयार करण्यासाठी निगवेकर यांनी प्रचंड कष्ट घेतले होते. २००० ते २००५ या कालावधीत ते ‘यूजीसी’चे अध्यक्ष होते, त्यावेळी उच्च शिक्षणाला महत्त्वपूर्ण बदल करणारे अनेक निर्णय घेतले. त्यांच्या कामाची दखल घेत युनिस्को पुरस्काराने तसेच देशातील नामवंत विद्यापीठांनी त्यांचा गौरव केला आहे. लोणार सरोवराच्या संवर्धन समितीवर त्यांनी काम केले. तसेच राज्य शासनाच्या विविध तज्ज्ञ समितीवर ते सदस्य राहिले होते. सकाळसह इतर वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिखाण केले आहे.

हेही वाचा: पुणे महापालिकेकडून 'कोविड शववाहिनी' अ‍ॅप; स्मशानभूमीही लगेच कळणार

श्रद्धांजली

‘युजीसीसह पुणे विद्यापीठ आणि नॅक जडणघडणीत डॉ. निगवेकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. उच्च शिक्षणाला योग्य दिशा देण्यासाठी समर्पण वृतीने कार्य करणारा एक शिक्षण तज्ज्ञ आपण गमावला आहे.’

- डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

पुणे विद्यीपाठीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक, विभागप्रमुख, त्यानंतर त्यांनी कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळली. इंडियन सायन्स कॉंग्रेसही त्यांच्याच नेतृत्वाखाली पार पडली होती. चांगले व्यक्तिमत्त्व, मितभाषी शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.’

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ

‘पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना अनेक संकल्पना पुढे आणल्या, ईएमआरसीची स्थापन झाली. त्यांच्या प्रयत्नातून नॅक उदयाला आली. यूजीसीचे अध्यक्ष म्हणून काम करताना विद्यापीठ, महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणात निधी मिळायला लागला. दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ होते. माझे तसेच शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.’

- डॉ. भूषण पटवर्धन, माजी उपाध्यक्ष, यूजीसी

शिक्षणाचे माहेरघर अशी बिरूदावली मिरविणे ज्या मोजक्या पुणेकर व्यक्तिमत्वांच्या अलौकिक कामगिरीमुळे शक्य झाले आहे, त्यामध्ये डॉ. निगवेकर सरांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे विद्यापीठ, यूजीसी या संस्थांना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.’’

- सतीश मगर, व्यवस्थापकीय संचालक, मगरपट्टासिटी ग्रूप