इतरही किल्ल्यांची दुरुस्ती करावी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलेल्या तोरणा गडावर पुन्हा शिवकालीन वैभव उभे राहत असून, तोरण्याप्रमाणेच इतर किल्ल्यांचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी वाचकांनी www.esakal.com वर प्रतिक्रियांच्या माध्यमातून केली आहे. 

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलेल्या तोरणा गडावर पुन्हा शिवकालीन वैभव उभे राहत असून, तोरण्याप्रमाणेच इतर किल्ल्यांचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी वाचकांनी www.esakal.com वर प्रतिक्रियांच्या माध्यमातून केली आहे. 

अतिदुर्गम आणि उंच तोरणागडाची अभेद्य तटबंदी, वास्तू, दरवाजे, तळी, टाक्‍यांची दुरुस्ती केली जात आहे. अनेक वर्षांनंतर गडाच्या डागडुजीची कामे होत असल्याने शिवकालीन अवशेषातून शिवरायांचा अनमोल ठेवा प्रथमच जगासमोर येत आहे. संबंधित वृत्त ‘सकाळ’सह ‘ई-सकाळ’वर ‘तोरणागडाला पुन्हा शिवकालीन वैभव’ अशा शीर्षकाखाली व्हिडिओसह प्रसिद्ध झाले. बारा हजारांपेक्षा जास्त वाचकांनी व्हिडिओ पाहिला. त्यानंतर प्रतिक्रिया नोंदविताना 
वाचकांनी पुरातत्त्व विभागाला काही सूचना दिल्या आहेत. ‘छान उपक्रम, सर्व किल्ल्यांचे असेच नूतनीकरण झाले तर महाराष्ट्र पर्यटनात अव्वल ठरेल,’ असे रॉकी यांनी म्हटले आहे, तर विजय यांनी ‘पर्यटन विकसित करून हा खर्चही भरून निघेल,’ अशी प्रतिक्रिया नोंदविली. राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याचे अभिनंदन करतानाच ‘भारतातील ऐतिहासिक स्थळे किंवा बागबगीचे पाहायचे असल्यास तेथे शौचालयांची अडचण जाणवते. पुरातत्त्व विभाग आणि पालिका यांनी याची नोंद घ्यावी, पुनर्बांधणी करताना शक्‍य तितके जुन्या बांधकामाच्या जवळ जाणारे काम झाले पाहिजे. सर्व काम झाल्यावर प्रत्येक ठिकाणी पाट्या लावून हे काम कुणी केले, असे सांगायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव दिसले पाहिजे,’ अशा प्रतिक्रियाही वाचकांनी नोंदविल्या आहेत.

Web Title: fort repairing