पुणे : पेट्रोल पंपावर कार्डने पैसे भरताय? थांबा हे वाचाच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

- सायबर पोलिसांनी केली चौघांना अटक

पुणे : कॅम्पमधील एका पेट्रोल पंपावर काम करीत असताना पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांच्या डेबिट कार्डचे क्‍लोन तयार करून त्याद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीतील चौघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जुल्फीकार अहमद हुसेन (वय 21, रा. सिमला जि. मालदा), मिथुन अली (वय 27), नोयन सादिक शेख (वय 23) आणि सईमुद्दीन अली (वय 20, तिघेही रा. गौरीपुर, जि. मालदा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पश्‍चिम बंगाल येथील आहेत. सध्या ते वडगावशेरी येथे राहण्यास होते. याप्रकरणी फारुक नाझीर शेख (वय 42, रा. मिठानगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

भाजप आमदाराची दादागिरी, शेजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

शेख हे नऊ जानेवारी रोजी संबंधित पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. कार्डद्वारे पैसे भरत असताना आरोपींनी त्यांचे कार्ड क्‍लोन केले. त्यानंतर त्या कार्डद्वारे नऊ हजार रुपये काढून घेतले. अशाचप्रकारे पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची हातचलाखीने डेटा क्‍लोन करू घेत आणि पिन नंबरची नोंद करून घेत. याचा वापर करून ग्राहकांच्या खात्यावरून पैसे काढून घेत असत. 

तसेच आरोपींनी काही कार्ड क्‍लोन केले व काही डेटा इतर साथीदारांना विकला आहे. आरोपींकडून कार्ड क्‍लोन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करायचे आहे. ही टोळी परराज्यातील असून अजून कोणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास करायचा असल्याने सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी आरोपींना पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Arrested in Debit Card Cloning Case