esakal | पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेसह चौघांना अटक

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर
पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेसह चौघांना अटक
sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या एका महिलेसह चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खडकी परिसरात हि कारवाई करण्यात आली. याप्रकरणी निकीता गोपाळ ताले (वय 25, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी, भोसरी), राहुल बाळासाहेब वाळुंज (वय 27), रोहन बाळासाहेब वाळुंज (वय 20 , दोघेही रा. अमित अपार्टमेंट, चापेकर चौक, चिंचवड), प्रतीक गजानन भोर (वय 26, रा. अनुसया पार्क, श्री हॉस्पिटलसमोर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक जयश्री सवदती यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन चौघांविरोधात औषध किंमत नियंत्रण आदेश, जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम, औषधे, सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरसाठी ग्लोबल टेंडर काढणार - अजित पवार

खडकीतील गुरुद्वारा रस्त्यावर निकीता ताले हि महिला रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने संबंधीत भागामध्ये सापळा लावला. बनावट ग्राहकाच्या मदतीने पोलिसांनी तालेशी संपर्क साधला. तेव्हा तिने एक इंजेक्‍शन 37 हजार रुपयांना उपलब्ध होईल, असे बनावट ग्राहकाला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तालेला पकडले. चौकशीत भोर, वाळुंज यांनी तिला इंजेक्‍शन विक्रीसाठी दिल्याची माहिती तिने दिली. पोलिसांनी वाळुंज व भोर यांनाही ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक निरीक्षक प्रकाश मोरे, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे आदींनी ही कारवाई केली.

रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन बेकायदेशीररीत्या काळ्याबाजारात विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत काळाबाजार रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन विक्री करणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. रमेडेसिव्हीर इंजेक्‍शनची काळाबाजारात विक्री होत असल्यास नागरीकांनी त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली आहे.

इथे कळवा माहिती

नजिकचे पोलिस ठाणे किंवा पोलिस नियंत्रण कक्षाकडे 100 क्रमांकावर कळवा.

हेही वाचा: ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणला तर फासावर लटकवू - कोर्ट