esakal | विद्युत तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत चार दुभत्या गायींचा कोळसा

बोलून बातमी शोधा

विद्युत तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत चार दुभत्या गायींचा कोळसा
विद्युत तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत चार दुभत्या गायींचा कोळसा
sakal_logo
By
महेंद्र शिंदे

कडूस : विद्युतवाहक तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत गारगोटवाडी-कारामळी (ता.खेड) येथील अरुण धोंडीबा काळोखे यांच्या गोठ्यात बांधलेल्या चार दुभत्या गायींचा जागेवरच जळून कोळसा झाला तर तीन दुभत्या गायी व तीन कालवडी सुमारे सत्तर टक्क्यांच्यावर भाजल्या आहेत. या आगीत काळोखे यांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

ही घटना शुक्रवारी (ता.23) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कडूसच्या तलावाजवळ मुसळेवाडी परिसरात घडली. गारगोटवाडी कारामळी येथील रहिवासी धोडींबा भिवा काळोखे, अरुण काळोखे, संजय काळोखे यांचा कुमंडला नदीवरील बंधाऱ्याजवळ जनावरांचा गोठा आहे. गोठ्यालगत विजेचे रोहित्र उभे आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास विद्युतवाहक तारांच्या घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. ठिणग्यांमुळे काळोखे यांच्या सरमाडाने (वैरण) उभारलेल्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली.

हेही वाचा: पवना जलवाहिनी गोळीबार प्रकरण; जखमींच्या १२ वारसांना नोकरी

दुपारची वेळ असल्याने गोठ्यात सात दुभत्या गायी व तीन वासरे बांधलेली होती. अल्पावधीतच या गायी व वासरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला. गोठ्यातील दोन दुभत्या गायींचा जागेवरच जळून कोळसा झाला. पाच गायी व तीन वासरे मोठ्या प्रमाणात भाजली. परंतु या पाच गायांमधील दोन गायी सुद्धा सायंकाळी उपचारापूर्वीच मरण पावल्याने एकूण चार दुभत्या गायी मरण पावल्या. उर्वरित तीन गायी व तीन वासरांचे डोळे, पोट, कास गंभीररीत्या भाजले आहे. ही जनावरे सुमारे सत्तर टक्क्यांपर्यंत भाजली आहेत. आगीत जनावरांचा गोठा, वैरण व सात दुभत्या गायी व तीन वासरांचे मिळून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

हेही वाचा: गावाच्या आरोग्यासाठी धावले नाशिकचे पोलिस उपायुक्त

तलाठी बी.एस.राठोड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.लहू पोखरकर, पोलीस पाटील सुशिल पोटे, नवनाथ काळोखे यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच निवृत्ती नेहेरे, मनोहर बच्चे, गणेश मंडलिक, अतुल गारगोटे, आनंद पानमंद, दत्ता कंद, दादाभाऊ गारगोटे, अविनाश काळोखे, मारुती चव्हाण, कोडींभाऊ गारगोटे उपस्थित होते.आठच दिवसांपूर्वी काळोखे यांनी ऐंशी हजार रुपयांची दुभती गाई खरेदी केली होती. या गायीचा सुद्धा जागेवरच जळून कोळसा झाला. दहा पैकी चार जनावरे मरण पावली, उर्वरित तीन गायी व तीन वासरे गंभीररीत्या भाजली आहेत. आगीमुळे काळोखे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून विद्युत वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट, गारगोटवाडीच्या सरपंच वर्षा बच्चे, विकास सोसायटी अध्यक्ष पंडीत मोढवे यांनी केली आहे.