वानवडीमध्ये अचानक आग लागल्याने चार ते पाच घरे जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four to five houses burnt sudden fire in Wanwadi pune

वानवडीमध्ये अचानक आग लागल्याने चार ते पाच घरे जळून खाक

घोरपडी : वानवडी गावठाणातील शिवरकर चाळीमध्ये रात्री अचानक आग लागल्याने चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत.अग्निशमन दलाच्या सहा गाड्याच्या मदतीने साधारण एक तासांत आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून झोपड्या मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले.

साधारण साडेअकरा वाजता या परिसरात मांडवाचे सामान ठेवलेल्या खोलीमध्ये शॉर्टसर्किट झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या खोलीत ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन आगीने भडका घेतला. त्यामुळे आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली, रात्रीची वेळ असल्याने सर्व नागरिक झोपलेले होते, अचानक धूर आणि अग्नीच्या उष्णतेने नागरिकांना जाग आली. घरातील सिलेंडर घेऊन काही नागरिक आगीच्या ठिकाणापासून दूर पळत सुटले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्व सामान, कपडे, इतर साहित्य जळून खाक झाले आहे.