शिक्रापूर : चार वर्षीय शिवतेजने सर केले कळसूबाई शिखर

भरत पचंगे
Thursday, 7 January 2021

महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा १६४६ मीटर उंचीच्या कळसूबाई शिखराला शिक्रापूरातील शिवतेज राऊत याने नुकतीच गवसणी घातली.

शिक्रापूर : महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा १६४६ मिटर उंचीच्या कळसूबाई शिखराला नुकतीच गवसणी घातली. ती शिक्रापूरातील शिवतेज पंडित राऊत याने. जेमतेम ४ वर्षांच्या शिवतेजने हे कठीण चढण केवळ ३ तास ४० मिनीटात सर केले असून, कुणाच्याही आधाराशिवाय एवढे मोठे शिखर चढलेला शिवतेज हा एवढ्या कमी वयाचा पहिला कळसूबाई-वीर गिर्यारोहक ठरला आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मूळ शिक्रापूरातील असलेले व सध्या आकुर्डी (पुणे) येथे स्वत:चा व्यवसाय असलेले पंडित कचरु राऊत यांनाच मुळी गिर्यारोहणाची आवड आहे. केवळ पुस्तके वाचून पुण्यातील अभिनव महाविद्यालयात असताना कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील तब्बल ५० किल्ले-शिखरांवर गिर्यारोहण केले आहे.

याच पार्श्वभूमिवर त्यांच्या पोटी जन्मलेल्या शिवतेज याला घेवून त्यांनी यापूर्वी छोट्या तोरणा, शिवनेरी व पुरंदर अशा तीन ठिकाणी गिर्यारोहण केले. यात शिवतेजचा उत्साह आणि त्याचे कसब लक्षात येताच पंडित व त्यांच्या पत्नी प्रतिभा यांनी आपले मित्र धनश्री व ज्ञानेश्वर पिसाळ यांना सोबतीला घेवून तीन तारखेला कळसूबाई शिखरावर जाण्याचा निर्णय घेतला.

लहानग्या शिवतेजनेही या निर्णयाला होकार दिला आणि पहाटे सहा वाजता सुरू झालेली ही समुद्र सपाटीपासून १६४६ मिटरची अत्यंत अवघड चढणीची सफर शिवतेजने न थकता, न थांबता कळसूबाई मंदिरापुढे भगवा फडकवीत ३ तास ४० मिनिटात यशस्वी केली.

दरम्यान, आई प्रतिभा या प्राथमिक शिक्षिका असल्या तरी अद्याप शाळेतील श्रीगणेशाही न केलेल्या शिवतेजची ही कामगिरी शिक्रापूर परिसरात तसेच ज्या राऊतवाडीत पंडित राऊत यांचे बालपण गेले तिथेही कौतुकाचा विषय ठरली आहे. 

हे वाचा - चला भटकायला ; पुण्यातले किल्ले, ऐतिहासिक वास्तू खुल्या

तोत्रे बोल, धाडसाने बोलण्याचा आवाका आणि आव्हानं समोर पाहिजेतच असा स्वभाव जेमतेम चार वर्षांच्या वयातच दिसणाऱ्या शिवतेजला आता एवरेस्टही सर करायचंय. हे त्याचे स्वप्न केवळ राऊतवाडी, शिक्रापूर वा पुणे जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही भूषणावह स्वप्नवत असल्याची प्रतिक्रिया त्याचे वडील पंडित राऊत यांनी दिली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four-year-old Shivtej climbed the Kalsubai peak