

पान ५ - तातडीने
००००००००००००००००००००००००००००
बाळासाहेब सोळांकुरे पाटील
-व्यवस्थापकीय संचालक, भूदरगड नॅचरल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
-------------------------------------------------------------------
‘एफपीओ’साठी व्यवसाय आराखडा, आर्थिक शिस्त आवश्यक
-------------------------
सध्या शेतकऱ्यांची व्यापारशक्ती वाढवण्यासाठी ‘एफपीओ’ किती महत्त्वाची ठरते ?
- शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच ‘एफपीओ’ ही शेतकऱ्यांना एकत्रितपणे व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध झालेली महत्त्वाची व्यवस्था आहे. पूर्वी शेतकरी स्वतंत्रपणे उत्पादन करत होता आणि बाजारपेठेत त्याची शेतीमाल विक्रीची ताकद मर्यादित होती. मात्र, एफपीओच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येऊन उत्पादन, खरेदी, विक्री, प्रक्रिया आणि बाजारपेठ या सगळ्या गोष्टी सामूहिक पद्धतीने करू शकतो. कंपनी कायद्यानुसार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर शेतकरी केवळ उत्पादक न राहता कंपनीचा सभासद, संचालक आणि एका अर्थाने उद्योजक म्हणून पुढे येतो. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाराची ताकद वाढवण्यासाठी एफपीओ हे महत्त्वाचं माध्यम ठरू शकतं.
महाराष्ट्रात मोठ्या संख्येने एफपीओ आहेत. पण त्यापैकी प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी का दिसते?
- एफपीओ स्थापन करणं आणि ती कंपनी यशस्वीपणे चालवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कंपनी स्थापन झाल्यानंतर तिचं कामकाज कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपनीप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने चालवावं लागतं. कंपनीची कायदेशीर प्रक्रिया, अनुपालन, लेखा, बाजारपेठ, व्यवसाय नियोजन, संचालक मंडळाची जबाबदारी या सगळ्याच गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. अनेक वेळा अर्धवट माहिती किंवा केवळ एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनी स्थापन केली जाते. त्यामुळे कंपनी स्थापन झाल्यानंतर तिचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि व्यवस्थापन नसल्यास ती प्रत्यक्षात कार्यरत राहत नाही.
सरकारची यामध्ये काय भूमिका हवी?
केवळ किती एफपीओ नोंदणीकृत झाल्या हा आकडा पुरेसा नाही. कंपनी स्थापन झाल्यानंतर ती प्रत्यक्ष व्यवसाय करते का, सभासद शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो का, कंपनीची उलाढाल आणि नफा वाढतोय का, शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळतेय का, हे तपासणं महत्त्वाचं आहे. शासनाच्या यंत्रणांनी स्थापन झालेल्या एफपीओंचा नियमित आढावा घेतला पाहिजे. कोणती कंपनी कार्यरत आहे, कोणती बंद आहे आणि कोणत्या कंपनीला कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे, याचा तालुकानिहाय आढावा घेतला तर धोरण अधिक परिणामकारक होऊ शकतं.
एफपीओची उलाढाल कोट्यवधी रुपयांची असली तरी सभासद शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नाही, अशी तक्रार आहे. याबद्दल काय सांगाल?
- एफपीओची उलाढाल वाढणं आणि सभासद शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणं या दोन गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असल्या पाहिजेत. कंपनीचा व्यवसाय मोठा झाला, पण त्या व्यवसायातून सभासद शेतकऱ्याला उत्पादनासाठी चांगली किंमत मिळत नसेल, निविष्ठा स्वस्त मिळत नसतील किंवा मूल्यवर्धनातून त्याला फायदा मिळत नसेल, तर त्या कंपनीच्या यशाचं मोजमाप पूर्ण होत नाही. कंपनीची उलाढाल, नफा आणि विस्तार यासोबत सभासद शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत प्रत्यक्ष काय बदल झाला, हेही पाहणं आवश्यक आहे.
एफपीओच्या माध्यमातून शेतमाल जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याची संधी किती मोठी आहे?
- जागतिक बाजारपेठेत जाण्याची संधी नक्कीच आहे. मात्र त्यासाठी केवळ उत्पादन करून चालणार नाही. आज जगभरातील ग्राहक अन्नाच्या गुणवत्तेबाबत अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने उत्पादन करण्यासोबतच त्याचं योग्य प्रमाणपत्र, गुणवत्ता आणि अवशेषांची पातळी म्हणजेच एमआरएल यासारख्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. शेतमालाची गुणवत्ता, सुरक्षितता, सातत्यपूर्ण पुरवठा आणि आवश्यक प्रमाणपत्रं या गोष्टी पूर्ण केल्या तर एफपीओच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्याची मोठी संधी आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी अशा संकटांमध्ये एफपीओ शेतकऱ्यांसाठी काय भूमिका बजावू शकतो?
- हवामान बदलामुळे शेतीसमोरील अनिश्चितता वाढली आहे. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, तर दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होते; काही वेळा पेरण्या लांबतात, तर काही भागात पिकांचे नुकसान होतं. अशा परिस्थितीत एकट्या शेतकऱ्याची जोखीम मोठी असते. मात्र समूहाने काम केल्यामुळे उत्पादन नियोजन, शेती व्यवस्थापन, साठवणूक, प्रक्रिया, बाजारपेठ आणि उपलब्ध संसाधनांचा वापर अधिक नियोजनबद्ध करता येतो. त्यामुळे एफपीओ हा केवळ शेतमाल विक्रीचा प्लॅटफॉर्म न राहता हवामानाच्या जोखमीशी सामना करण्यासाठी सामूहिक शेती व्यवस्थापनाचा आधार बनू शकतो.
एफपीओच्या वाढीसाठी भांडवल आणि बँक कर्ज हा मोठा अडथळा असल्याचं सांगितलं जातं. प्रत्यक्षात अडचण नेमकी कुठे आहे?
- एफपीओला व्यवसाय वाढवण्यासाठी खेळतं भांडवल आणि कर्जाची गरज असते. मात्र बँकेकडे कर्ज मागण्यापूर्वी कंपनीने स्वतःची आर्थिक आणि पतस्थिती मजबूत ठेवणं गरजेचं आहे. संचालक मंडळातील सदस्यांचा सिबिल रेकॉर्ड, कंपनीचे आर्थिक व्यवहार, कर्जफेडीचा इतिहास आणि बाजारातील पत या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे केवळ सरकार किंवा बँकांनी कर्ज द्यावं अशी अपेक्षा न ठेवता एफपीओच्या संचालक मंडळाने स्वतःची पत व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी कंपनीचा व्यवस्थित व्यवसाय आराखडा आणि आर्थिक शिस्त असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
-------------