.

.
Published on

युरोप ‘हॉट’स्पॉट; फ्रान्समध्ये ‘रेड ॲलर्ट’

तापमानवाढीने जनजीवन विस्कळित; सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम

पॅरिस/लंडन ता. २३ (पीटीआय) : फ्रान्ससह संपूर्ण युरोप सध्या निसर्गाच्या अभूतपूर्व कोपाचा सामना करत आहे. फ्रान्समध्ये उष्णतेच्या लाटेने रौद्र रूप धारण केले असून, सलग दुसऱ्या दिवशी लाखो नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने देशातील तब्बल ५४ विभागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘रेड ॲलर्ट’ जारी केला आहे. केवळ फ्रान्सच नव्हे, तर शेजारील इटली, स्पेन आणि बेल्जियम या देशांनाही या तीव्र तापमानवाढीने कचाट्यात घेतले आहे. फक्त फ्रान्समध्ये चार दिवसांत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
फ्रान्समधील परिस्थिती अधिक चिंताजनक होण्यामागचे कारण म्हणजे तेथील पायाभूत सुविधा. फ्रान्समध्ये वातानुकूलित यंत्रणांचा वापर अत्यंत मर्यादित आहे. यामुळे प्रचंड उष्णतेचा थेट परिणाम शाळा, रेल्वे सेवा आणि क्रीडा स्पर्धांवर झाला आहे. या असह्य उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि स्वतःला थंड ठेवण्यासाठी नागरिक थंड पाण्याच्या स्रोतांकडे जात आहेत.
फ्रान्समधील हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आठवड्याच्या अखेरपर्यंत हा उकाडा असाच कायम राहणार असून अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीची तुलना आता थेट ऑगस्ट २००३ मधील उष्णतेच्या लाटेशी केली जात आहे. या लाटेमध्ये अंदाजे १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.

कालावधी वाढला

लंडनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनामध्ये तापमानवाढीच्या जागतिक संकटावर अधिक प्रकाश टाकला आहे. मेक्सिको, केनिया, इटली आणि जगातील इतर देशांमध्ये आता उष्णतेचा कालावधी एक ते दोन महिन्यांनी वाढला आहे. ‘नेचर क्लायमेट चेंज’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, कोळसा, तेल आणि वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांच्या बेसुमार ज्वलनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. गेल्या ६० वर्षांमध्ये उष्णतेचे दिवस आणि उष्ण रात्रींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संस्थेने इशारा दिला आहे की, मानवनिर्मित हवामान बदलामुळे पुढील पाच वर्षांत उष्णतेचे संकट आणखी भीषण रूप धारण करू शकते.
.....

आकडे बोलतात

२,००,०००
गेल्या चार वर्षांत युरोपात उष्णतेने झालेले मृत्यू

सन २०२४
युरोपातील सर्वाधिक उष्णतेचे वर्ष

५४
फ्रान्समधील विभागांत ‘रेड ॲलर्ट’

४० अंश से.
युरोपातील संभाव्य तापमानवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com