
पुणे : ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्रा. रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट' हा सर्वोच्च स्तरावरील सन्मान जाहीर झाला आहे. भारत - फ्रान्स यांच्यामधील संयुक्त संशोधनाचा विकास, तसेच मूलभूत विज्ञानात महिलांचे प्रमाण वाढावे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी निवड करण्यात आली आहे.
सध्या भारतीय विज्ञान संस्थेत (आयआयएस्सी) कार्यरत असलेल्या प्रा.गोडबोले यांचे शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण सर परशुराम महाविद्यालयातून झाले. त्यांनी १९७२ साली बी.एस.सी.ची पदवी मिळवली, तेव्हा त्या तेंव्हाच्या पुणे विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून त्यांनी एम.एस.सी.ची पदवीही पहिल्या क्रमांकाने मिळवली. पुढे १९७९ मध्ये अमेरिकेच्या स्टेट युनिव्हर्सिटी मधून त्यांनी पीएच्.डी.केलं.
- संशोधन
- पीएच्.डी.नंतर ३ वर्षे गोडबोले यांनी मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्था (टी.आय.एफ.आर.) मध्ये काम केले. नंतर ४ महिने मुंबईला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आणि १२ वर्षे मुंबई विद्यापीठात सुरुवातीला व्याख्याती आणि नंतर अधिव्याख्याती म्हणून काम केले.
- त्या सध्या (२०१९पासून) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरू येथे काम करतात.
- कण भौतिकी, उच्च ऊर्जा भौतिकी आणि कोलायडर भौतिकी या विषयांत त्यांनी चाळीसहून अधिक वर्षे संशोधक प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
- डॉ. गोडबोले युरोपीय संशोधन प्रयोगशाळा, सर्नमधील आंतरराष्ट्रीय लिनियर कोलायडरच्या इंटरनॅशनल डीटेक्टर अॅडव्हायझरी गृप (आयडीएजी) मध्ये २००७ ते २०१२ या कालावधीत सहभागी झाल्या होत्या.
- इंटरनॅशनल डीटेक्टर अॅडव्हायझरी ग्रुप आयएलसी डीटेक्टरचे संशोधन, संशोधन संचालनालयाचा विकास यावर आणि डीटेक्टर डिझाईन गटांवर लक्ष ठेवतो.
- त्या भारतीय विज्ञान अकादमीच्या विज्ञान क्षेत्रातील स्त्रियांच्या पुढाकाराबद्दल काम करणाऱ्या सदस्य गटाच्या अध्यक्षा आहेत.