पार्टनरशिपचं आमिष दाखवलं अन् पुणेकराला दोन मुंबईकरांनी लुटलं!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

आरोपी पाशा आणि निवळकर यांची 'द रॉक इव्हेंट मॅनेजमेंट' नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे.

पुणे : इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर भागीदारी करण्याचे आमिष दाखवीत एका नागरिकाची साडे सतरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मुंबईच्या दोन व्यावसायिकांविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिलेन साबीर पाशा, अक्षया अशोक निवळकर (दोघेही रा. पनवेल, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित दिलीप उभे (वय 31,रा. धायरी, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाशा आणि निवळकर यांची 'द रॉक इव्हेंट मॅनेजमेंट' नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्या दोघांची एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत फिर्यादी उभे यांच्याशी ओळख झाली होती.

Video: बायकोला किस करायची पण पंचाईत झालीय; बड्या नेत्याचं भर सभेत वक्तव्य​

दोघांनी उभे यांना इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास 40 टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी 17 लाख 62 हजार रुपयांची रक्कम घेतली. त्यानंतर उभे यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. त्यामुळे फिर्यादी उभे यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of above 17 lakhs by showing lure of investing in an event management company