Pune : पदभरती होत असल्याच्या नावाखाली केली जातेय फसवणूक ; सावध राहण्याचा ‘एआयसीटीई’चा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

पदभरती होत असल्याच्या नावाखाली केली जातेय फसवणूक ; सावध राहण्याचा ‘एआयसीटीई’चा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमध्ये (एआयसीटीई) विविध जागांवरील भरती प्रक्रियेत सहभागी व्हा, असे तुम्हाला कोणी सांगत आहे का!, ‘एआयसीटीई’मध्ये तालुका, जिल्हा समन्वयक अशा जागा असून काही अधिकारी (तोतया) तुम्हाला प्रत्यक्ष भेटत आहेत का!, असे जर तुमच्याबाबत घडत असेल तर सावध रहा. होय, सध्या एआयसीटीईमध्ये विविध जागांसाठी भरती सुरू असल्याचे सांगून इच्छुक उमेदवारांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याची गंभीर दखल घेत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने अशा फसवणूकीपासून सावध राहण्याचा इशारा इच्छुक उमेदवारांना दिला आहे.

‘एआयसीटीई’चे अधिकारी असल्याचे सांगून भरती प्रक्रियेच्या नावाखाली इच्छुक उमेदवारांची फसवणूक होत आहे. असे तोतया अधिकारी आढळल्यास त्याची माहिती तातडीने एआयसीटीईला द्यावी, असे आवाहनही तंत्रशिक्षण परिषदेने केले आहे. काही अज्ञात व्यक्ती एआयसीटीईचे अधिकारी असल्याचे सांगून परिषदेमधील विविध जागांवरील भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना गाठत आहेत. एआयसीटीईमध्ये तालुका, जिल्हा समन्वयक, झोनल अधिकारी, झोनल प्रमुख अशा पदांसाठी भरती असल्याचे हे तोतया अधिकारी सांगत आहेत. परंतु अशाप्रकारे कोणत्याही प्रकारची भरती होत नसल्याचे एआयसीटीईने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अशा लोकांपासून सावध राहावे, अन्यथा फसवणूक झाल्यास त्याला एआयसीटीई जबाबदार राहणार नाही, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या सप्टेंबरमध्येही ‘एआयसीटीई’ने भरतीच्या बोगस संकेतस्थळाबद्दलही सर्वांना सावध केले होते. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही माहिती घ्यायची असल्यास एआयसीटीईच्या ‘www.aicte-india.org’ या अधिकृत संकेतस्थळालाच भेट द्यावी आणि त्यावरील माहिती ग्राह्य धरावी, अशी सूचनाही परिषदेने केली आहे

loading image
go to top