esakal | कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाइन शिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Padhega Bharat

कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाइन शिक्षण

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - ‘कोरोनाच्या (Corona) महामारीत अनेक विद्यार्थी (Student) आणि त्यांच्या कुटुंबाची कल्पना करता येणार नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजाने आणि विविध संस्थांनी अशा विद्यार्थ्यांचे पालकत्व (Guardianship) घेणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत (Educational Help) करण्याची गरज आहे. त्या दृष्टिने ‘पढेगा भारत’चा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.’, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. (Free Online Education for Students Lost a Parent Corona)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालक गमाविलेल्या राज्यातील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण मिळावे, यासाठी 'पढेगा भारत' संस्थेच्या वतीने विनामूल्य ऑनलाइन शिक्षण सुविधेचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार अमर साबळे, सभागृह नेते गणेश बिडकर, शिक्षण समिती अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक धीरज घाटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नागरिकांच्या 'आरटीओ'तील खेपा वाचणार!

साबळे म्हणाले,‘‘कोरोनामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, म्हणून सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नैतिक मूल्याधारित गोष्टी, प्रात्यक्षिकांवर आधारित कृतिशील शिक्षण आणि थ्रीडी ॲनिमेशन तंत्रज्ञानाचा वापर ही उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होणार आहे.’’ संस्थेच्या अध्यक्षा वेणू साबळे यांनी प्रास्ताविक केले.

‘पढेगा भारत’ संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाचे वैशिष्ट्ये :

फिनलॅंड शैक्षणिक धोरण आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांचा तुलनात्मक अभ्यास करून प्रथमच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला अनुसरून व्हिडिओ साहित्याची निर्मिती केली आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेतील आजी-माजी १५० तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. एकूण बाराशेहून अधिक व्हिडिओ तयार केले आहेत.

पाचवी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरणार आहेत. वैयक्तिकपणे किंवा शाळेच्या माध्यमातून सामुदायिक पद्धतीने लाभार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्याबाबत अधिक माहिती ‘https://padhegabharat.com’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.'

loading image