Friendship Day Special : मैत्रीच्या बंधाला सेवेचे कोंदण!

पूजा ढेरिंगे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

‘गर्ल ऑन विंग चेअर’
या मैत्रीतलं आणखी एक विशेष म्हणजे दीक्षा ही दिव्यांग; पण इतर तिघींनी तिला कधीच तिच्या अधुरेपणाची जाणीव होऊ दिली नाही. कॉलेज सुटलं की, या तिघी घरी जाऊन तिला पिक-अप करायच्या. तेथून त्या चौघी झेड ब्रीजच्या खाली येऊन शाळा भरवायच्या. कुठे फिरायला जायचं म्हटलं तरी तिला सोबत घेऊनच. दीक्षाला पाठीवर घेऊन तिघींनी गोवा, कोकण आदी भागांची सफर केली. त्या आठवणी सांगताना दीक्षाचे डोळे पाणवतात. या मैत्रीने ‘गर्ल ऑन विंग चेअर’ म्हणजेच ‘पंखांच्या खुर्चीवर बसणारी मुलगी’ हा आत्मविश्वास माझ्यात निर्माण केला, असंही ती अभिमानाने सांगते.

पुणे - मैत्री म्हणजे प्रेम, मैत्री म्हणजे काळजी, मैत्री म्हणजे आणि बरंच काही...पण मैत्रीच्या या कुठल्याच व्याख्येत त्या चौघींची मैत्री बसत नाही! तरीही या मैत्रीने त्यांच्याबरोबरच इतरांचेही आयुष्य सुकर केलंय. 

...ही गोष्ट आहे दीक्षा दिंडे, मृण्मयी कोळपे, पूजा मानखेडकर आणि सेवा शिंदे या मैत्रिणींची. या मैत्रीला त्यांनी नाव दिलंय तेही छानच, यू ओन्ली लिव्ह वन्स अर्थात योलो! 

तीन वर्षांपूर्वी ‘रोशनी’ या स्वयंसेवी संस्थेच्या औपचारिक बैठकीत चौघींची भेट झाली. तेथेच या मैत्रीची कळी उमलली अन्‌ बघता बघता तिचे फूल कधी झाले हे कळलेच नाही. गप्पा आणि चर्चा वाढू लागली. या मैत्रीच्या बंधाला समाजाच्या सेवेचे कोंदण द्यायचे ठरवले. त्यातूनच त्यांनी सर्वप्रथम ‘बिनभिंतीची शाळा’ हा उपक्रम सुरू केला. त्यांची ही शाळा सुरू झाली ती झेड ब्रीजच्या खाली. या परिसरातील वंचित मुले हे त्यांचे विद्यार्थी. हा उपक्रम सलग दीड वर्षे सुरू होता. त्यातूनच मुलांना शाळेची गोडी लागली आणि ते महापालिकेच्या शाळेत जाऊ लागले. 

मैत्रीतले वेगळेपण सांगताना पूजा म्हणाली, ‘‘आमची मैत्री सामाजिक कार्यातून झाली असली तरी आम्ही मुली नाही, तर माणूस म्हणून जगू लागलो. आम्ही मुली असलो तरी आमच्या मैत्रीने आमच्यात सुरक्षिततेच्या भावनेची पेरणी केली. रात्रीही आम्ही एकमेकींच्या साथीने रस्त्यावर फिरू लागलो. आमची वर्षात एक तरी ‘रोड ट्रीप’ ठरलेली असतेच’’ आता चौघींना वेगळ्या संधी निर्माण झाल्या आहेत. पूजाला ऑस्ट्रेलिया, सेवाला कॅलिफोर्निया आणि मृण्मयीला अमरावतीला नोकरीसाठी जावं लागत आहे.

पण कुठेही जावं लागलं तरी मैत्रीचे बंध कायम राहतील, समाजसेवेचा घेतलेला वसा पुढेही चालूच ठेवायचा, असा निर्धारही त्या बोलून दाखवितात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Day Special Relation