esakal | ससूनमधील ३२ व्हेंटिलेटर ‘प्राणहीन’
sakal

बोलून बातमी शोधा

ससून

ससूनमधील ३२ व्हेंटिलेटर ‘प्राणहीन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरासह जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना, ससून रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीअभावी ३२ व्हेंटिलेटर ‘प्राणहीन’ अवस्थेत आहेत. ते सुरू करण्याची तसदी यंत्रणेने घेतली असती तर शेकडो रुग्णांचे प्राण वाचले असते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. झपाट्याने रुग्णसंख्या वाढल्याने पहिल्या टप्प्यात बेडसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागली. बेड मिळाला, तर रेमडेसिव्हिर मिळवताना अनेकांची दमछाक झाली. यामध्ये काळाबाजार होऊन नागरिकांची लूट झाली. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करताना जिल्हा प्रशासन, महापालिकेचाच श्‍वास गुदमरतो, की काय एवढी भयाण स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेसह चौघांना अटक

कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था मजबूत केली पाहिजे, असा धडा पहिल्या लाटेत मिळाला; पण गेल्या वर्षभरात पुण्यात भरीव काम झाले नाही. केवळ तात्पुरत्या कोविड रुग्णालयावरच शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ‘पीएम केअर’मधून ससून रुग्णालयाला ८६ व्हेंटिलेटर मिळाले होते. त्यापैकी ३२ बंद पडले; पण ते दुरुस्त करून पुन्हा वापरात आणावेत, असे प्रशासनाला वाटले नाही. ससूनमध्ये रोज सुमारे ५० जणांचा कोरोनाने बळी जात असताना व शहरातील सुविधा अपुऱ्या पडत असताना हे व्हेंटिलेटर सुरू असते तर आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव वाचला असता. ३२ पैकी २२ पालिकेने ताब्यात घेतले आहेत; पण त्यातील एकही व्हेंटिलेटर अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही.

कोरोनाची पहिली साथ आली तेव्हाच महापालिकेकडे रुग्णालयासाठी बांधून तयार असलेल्या इमारतींमध्ये कायमस्वरूपी रुग्णालय सुरू केले असते तर पुणेकरांना फायदा झाला असता. ‘जम्बो’वर ३०० कोटी खर्च केले; पण ही तात्पुरती व्यवस्था आहे. तसेच महापालिका व शासनाच्या आरोग्य विभागातील पदे रिक्त आहेत. ही पदे भरली असती तर रुग्णांना चांगली सेवा मिळाली असती. ससूनमध्ये बंद पडलेले व्हेंटिलेटर दुरुस्त केले असते, पालिकेने न वापरलेल्या ४०० ऑक्सिजन बेडचा वापर केला असता तर लोकांचे प्राण वाचले असते.

-डॉ. अभिजित मोरे, संघटनमंत्री आप

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top