esakal | पुणेकरांनो, काळजी करू नका! फळे, भाजीपाला मिळणार, दुपारी १ पर्यंत सोमवार ते शुक्रवार मार्केट यार्ड सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Market Yard Fruits vegetables

पुणेकरांनो, काळजी करू नका! फळे, भाजीपाला मिळणार

sakal_logo
By
प्रविण डोके

मार्केट यार्ड(पुणे) : सोमवार ते शुक्रवार मार्केट यार्डातील बाजार सुरू राहणार आहेत. बाजारातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी, फुले आणि पान विभाग पहाटे ते दुपारी एकपर्यंत सुरू राहणार आहे. तर गूळ-भुसार विभाग सकाळी ९ ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहे. शनिवार, रविवार विकेंड लॉकडाउनमुळे मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बंद राहतील.

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दिवसाआड एक-एक विभाग सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु शनिवार, रविवार विकेंड लॉकडाउन असल्याने सोमवार ते शुक्रवार ठरलेल्या वेळेत बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला दि. पूना मर्चंटस् चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, वालचंद संचेती, प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, रायकुमार नहार, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष युवराज काची आदी उपस्थित होते.

बाजारातील सर्व टपऱ्या, हातगाडे बंद केले आहेत. तसेच हॉटेल्समधून फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. तर बाजारात एका गेटने माल घेऊन येणाऱ्या वाहनांना प्रवेश, दर दुसऱ्या गेटने वाहनांना बाहेर पडण्यासाठी नियोजन केले आहे. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी विभागानुसार कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आज (गुरुवार) पासून बाजारात पोलिसांचाही बंदोबस्त असणार आहे.

''खरेदीसाठी मार्केटयार्डातील विविध विभागात ग्राहकांची गर्दी होत आहे. या गर्दीला आळा घालण्यासाठी किरकोळ खरेदी करणाऱ्यांना बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे घरगुती किरकोळ खरेदीदार यांनी गर्दी न करता सहकार्य करावे.''

- मधुकांत गरड , प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

परवाना धारकांना फक्त प्रवेश

''माल घेऊन येणाऱ्या टेम्पोलाही पास दिला जाणार आहे. त्यामुळे वाहनांचीही गर्दी होणार नाही. गाळ्यावरही सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासनाने अडत्यांना दिल्या आहेत. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे, अशानाच बाजारात खरेदीसाठी परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे कोणालाही बाजारात खरेदीसाठी येता येणार नाही.''