
चित्रपटांच्या पुनरुज्जीवनासाठी ३६३ कोटी रुपयांची तरतूद - अनुराग ठाकूर
पुणे : ‘‘देशातील समृद्ध अशा चित्रपटसृष्टीच्या वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी २०१६ मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा उद्देश आहे. या अभियानासाठी एकूण ५९७ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी ३६३ कोटी रुपयांची तरतूद केवळ चित्रपटांच्या पुनरुज्जीवनावर खर्च करण्यात येतील,’’ असे सूतोवाच केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) ठाकूर यांनी गुरुवारी भेट दिली आणि दोन्ही संस्थांमध्ये कामकाजाची आढावा बैठक घेतली.
ते म्हणाले,‘‘देशातील चित्रपटांचे पुनरुज्जीवन हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पांपैकी एक असेल. या प्रकल्पांतर्गत पाच हजार ९०० हून अधिक लघुपट, माहितीपट आणि चित्रपटांचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुनरुज्जीवन प्रक्रियेमध्ये लघुपट, फीचर्स, विविध भारतीय भाषांमध्ये बनवलेले माहितीपट यासह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. मौल्यवान चित्रपट वारसा पुनरुज्जीवित आणि संग्रहित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.’’
एफटीआयआय हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार
‘‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्याची जोपासना करत संस्थेने चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात ‘स्टार्टअप्स्’साठी विद्यार्थ्यांना सज्ज करावे’’, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
एफटीआयआय भेटीदरम्यान ठाकूर यांनी संस्थेतील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी एफटीआयआय आंतरराष्ट्रीय तोडीचे करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली. संस्थेला ॲनिमेशन, गेमिंग आणि कॉमिक्समध्ये प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून घडविणे, यासाठी पावले उचलली जावीत, अशा ठाकूर यांनी सूचना यावेळी दिल्या. भारत हा जागतिक पातळीवर ‘आशय केंद्र’ ठरावा, यासाठी दृष्टीने आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेने उद्योग क्षेत्रातून भागीदार आणावेत, देशाच्या विविध भागात चित्रपट आणि दूरचित्रवाणी निर्मितीचे अभ्यासक्रम राबवावेत, असे आवाहन ठाकूर यांनी केले.
‘एफटीआयआय’च्या ‘लेन्ससाइट’ या शैक्षणिक नियतकालिकेच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन ठाकूर यांच्या हस्ते याप्रसंगी झाले. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा, संस्थेचे अध्यक्ष शेखर कपूर, संचालक संदीप शहारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Web Title: Ftii 363 Crore For Revival Digitization Of Films Anurag Thakur Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..