ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 June 2019

पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात...

पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात...

घटनाक्रम 2007
एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ज्योतीकुमारी ही कंपनीच्या कारने कामाला जात असताना वाहनचालक पुरुषोत्तम बोराटे व त्याचा मित्र प्रदीप कोकडे यांनी ज्योतीस खोटे कारण सांगून कार कंपनीच्या दिशेने न वळवता गहुंजे गावाकडे वळवली. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार करून तिचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. तसेच मृतदेह रस्त्यावरच सोडून या दोघांनी पलायन केले होते. दरम्यान ज्योतीकुमारी घरी न आल्याने ती हरवल्याची तक्रार चतुशृंगी पोलिस चौकीत तिच्या घरच्यांनी नोंदवली होती. या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना आरोपींचे वकील महेंद्र कवचाळे यांच्याकडे वकिलीची सनदच नसल्याचे लक्षात आल्याने केस अ‍ॅड.अतुल पाटील व पवन कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. दुबार सुनावणीमुळे केस इतके दिवस रेंगाळली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याइतपत पुरावे सादर केल्याने ख-या अर्थाने ज्योतीकुमारीला न्याय मिळाल्याची भावना आहे

2012: हत्येचा कट पूर्वनियोजित, त्यात वासनेचा भाग मोठा....
आयटी, बीपीओ क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण राज्यभर गाजले. महाराष्ट्र सरकारने या खटल्याचे गांभीर्य ओळखून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची याप्रकरणी नियुक्ती केली होती. जिल्हा न्यायाधीश अनंत बदर यांनी खटल्याचा निकाल देताना सांगितले की, हत्या व हत्येचा कट रचणा-या आरोपींना फाशीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दोन वर्षे सक्तमजुरी तसेच बलात्कार व अपहरण या गुन्ह्याखाली दहा हजार रुपये दंड आणि दोन वर्ष सक्तमजुरी, जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच मृताच्या शरीरावरील दागिने पळवण्याच्या गुन्ह्याखाली दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयाने सांगितले की, हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ घटना असून आरोपींनी ज्योतीकुमारीचा निर्घृणपणे खून केला आहे. हत्येचा कट पूर्वनियोजित असून त्यात वासनेचा भाग मोठा आहे. राष्ट्रीय महिला आयोग व असोचेम यांच्या महिला सुरक्षेच्या एका सर्वेक्षणानुसार देशातील आयटी, बीपीओ क्षेत्रात 40 टक्के महिला काम करतात. या महिलांना मुख्यत: रात्रीच्या वेळेस काम करावे लागते, कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे या महिलांचे कुटुंब त्यांना परवानगी देत असतात. ज्योतीकुमारीच्या घटनेमुळे देशातील अशा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निकालाच्या पुढील कारवाईसाठी आरोपींना उच्च न्यायालयात जाता येईल. हिंजवडी भागातील एका कॉल सेंटरमध्ये काम करणारी ज्योतीकुमारी चौधरी या युवतीचे अपहरण करून बलात्कार व खून करणारे आरोपी पुरुषोत्तम बोराटे (वय 30, रा.गहुंजे) व प्रदीप कोकडे (वय 30,रा.गहुंजे) या दोघांना जिल्हा न्यायाधीश अनंत बदर यांच्या न्यायालयाने दुहेरी फाशी व जन्मठेपची शिक्षा सुनावली होती

नातेवाइकांकडून समाधान
ज्योतीकुमारीचे नातेवाईक शिशिर पुंडलीक निकालानंतर म्हणाले, न्यायलयाने दिलेला निकाल समाधानकारक असून, महाराष्ट्र शासन व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे आम्ही आभारी आहोत. निकम यांनी या प्रकरणात विशेष रस घेतला व प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नये याकरिता हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

ज्योतीची बहीण भावनावश
न्यायालयात निकाल ऐकत असताना ज्योतीकुमारीची बहीण सुधाकुमारी भावनाविवश झाली होती. आरोपींना फाशीची जबर शिक्षा ठोठावण्यात आल्याने आपल्या बहिणीस न्याय मिळाला, असे सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. निकालानंतर ती रडतच न्यायालयाबाहेर पडली व प्रसारमाध्यमांशी बोलणेही तिला शक्य झाले नाही.

2019 :
कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना सोमवारी (ता. 24) फाशी देण्यात येणार होती. मात्र, शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. युक्तिवादानंतर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने फाशीच्या स्थगितीचा आदेश दिला, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील युग चौधरी यांनी दिली. त्यास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही दुजोरा दिला.

ज्योती कुमारी बलात्कार प्रकरण; आरोपींच्या फाशीला स्थगिती

ज्योती कुमारी चौधरीला न्याय मिळाला आहे का? काय वाटते तुम्हाला... जरूर व्यक्त व्हा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: full story of bpo employee jyoti kumari rape and murder case