esakal | पुण्यातील ‘खेडेकर’मध्येही होणार आता बुरशीवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

पुण्यातील ‘खेडेकर’मध्येही होणार आता बुरशीवर उपचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनापाठोपाठ (Corona) ‘म्युकरमायकोसिस’च्या (mucormycosis) (काळी बुरशी) आजाराने (Sickness) हैराण झालेल्या रुग्णांची (Patient) ‘मेडिकल हिस्ट्री’ गोळा करून गंभीर रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रियेची (Surgery) तयारी महापालिकेने (Municipal) केली आहे. या आजाराच्या रुग्णांची यादी तयार करून पुढील उपचाराचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येत असून, त्यासाठी स्वतंत्र डेस्क सुरू केला आहे. त्याचवेळी दळवीपाठोपाठ महापालिकेच्या खेडेकर हॉस्पिटलमध्ये (Khedekar Hospital) उपचार सोय केली जाणार आहे. (fungus will now be treated at Khedekar in Pune)

गेल्या दोन दिवसांत महापालिकेकडे दहा रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ‘ऑपरेशन थिएटर’ आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम सुरू असून, पुढच्या १० दिवसांत प्रत्यक्ष उपचार मिळणार आहेत. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची माहिती घेऊन, पहिल्या टप्प्यात गंभीर रुग्णांवर उपचार म्हणजे शस्त्रक्रिया करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. कोरोनामुक्त आणि रुग्णालयातून घरी गेल्यानंतर ‘म्युकरमायकोसिस’ होत असल्याचे दिसून येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: पुणेकरांना दिलासा! शहरात आज हजारपेक्षाही कमी रुग्ण

मात्र, उपचारादरम्यानही या आजाराचे निदान होऊन रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या चेहऱ्याच्या कोणत्या भागावर बुरशी आहे, तिचे प्रमाण, रुग्णंना अन्य कोणते आजार आहेत का, त्याच्या फुफ्फुसातील न्युमोनियाचे प्रमाण आणि इतर आजाराची नोंद करण्यासाठी महपालिकेने पुढाकार घेतला आहे. ज्यामुळे उपचारात वेळ जाणार नाही आणि वेळेत नेमके उपचार मिळणार आहेत, अशा सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिल्या आहेत.

‘म्युकरमायकोसिस’च्या दहा रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, अद्याप उपचाराची यंत्रणा उभारणी सुरू असल्याने रुग्णालये आणि नातेवाइकांकडून रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. त्यासाठीचा स्वतंत्र अर्ज तयार केला आहे. त्याशिवाय, संपर्कासाठी दळवी रुग्णालयात ‘डेस्क’ही असेल.

- डॉ. किरण भिसे, प्रमुख, म्युकरमायकोसिस विभाग, दळवी हॉस्पिटल

रुग्णांची संख्या पाहता त्याच्या उपचाराच्या बेड वाढविण्यात येणार आहेत. ही संख्या ३० पेक्षा अधिक असेल. ज्यामुळे महापालिका हद्दीसह इतर भागातील अत्यंत गंभीर रुग्णांना दाखल करून घेता येणार आहे. या बेडची संख्या वाढविताना त्या प्रमाणात मनुष्यबळही उपलब्ध करीत आहोत.

- डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण विभाग, महापालिका

loading image