फुरसुंगी मेट्रोचे पाऊल पडते पुढे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

असा असेल फुरसुंगी मेट्रोमार्ग  
स्वरूप - इलेव्हेटेड (जमिनीवर खांब उभारून) 
मार्ग - शिवाजीनगर (न्यायालय)-रेल्वे कॉलनी-जिल्हाधिकारी कार्यालय, एमजी रोड-फॅशन स्ट्रीट-मंमादेवी चौक-रेसकोर्स-काळूबाई चौक-वैदूवाडी-हडपसर फाटा-हडपसर बसडेपो-ग्लायडिंग सेंटर-फुरसुंगी आयटी पार्क-सुलभ गार्डन.

पुणे - शिवाजीनगर ते फुरसुंगी यादरम्यान सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या मेट्रोमार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रोने नुकताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) नुकताच दिला आहे. पीएमआरडीएची मान्यता मिळाल्यानंतर हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यान मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान, शिवाजीनगरपासून हा मेट्रोमार्ग हडपसरपर्यंत नेण्याची मागणी होत आहे. त्यानुसार हा मार्ग पुढे फुरसुंगीपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगी असा हा मार्ग असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हडपसरपर्यंत मेट्रो नेणार असल्याचे मध्यंतरी जाहीर केले. त्यामुळे हिंजवडी ते फुरसुंगी यादरम्यानच्या मेट्रोच्या मार्गावर शिक्कामोर्तब झाले होते.

शिवाजीनगर न्यायालय ते फुरसुंगी यादरम्यान मेट्रोमार्गाचे सर्वेक्षणाचे काम पीएमआरडीने दिल्ली मेट्रोला दिले होते. या कंपनीने या मार्गाचे सर्वेक्षण करून त्याबाबतचा अहवाल नुकताच प्राधिकरणाकडे दिला आहे. या महिन्यात प्राधिकरणाची बैठक होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये हा अहवाल मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर तो राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हिंजवडी ते शिवाजीनगर अशा २३ किलोमीटरच्या मेट्रोमार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. शिवाजीनगर ते फुरसुंगी असा मेट्रोमार्ग पीएमआरडीएकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. या संपूर्ण मेट्रोमार्गावरून ५७ मेट्रोच्या कार धावणार आहेत.

१५.५३ किलोमीटर लांबी 
१५ एकूण स्‍थानके
४.५ हजार कोटी अंदाजे खर्च


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fursungi Metro PMRDA