गडकरींनी मांडली नवीन पुण्याची संकल्पना

प्रदूषण रोखण्यासाठी शहराचे विकेंद्रकर हवे, नितीन गडकरी यांची सूचना
गडकरींनी मांडली नवीन पुण्याची संकल्पना
sakal

पुणे : देशातील प्रमुख प्रदूषित शहरामध्ये पुण्याचा वरचा क्रमांक आहे. पूर्वी पुण्याची हा खूप शुद्ध होती, पण आता जल, हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण खूप वाढले आहे. यासाठी वाहनांच्या हॉनर्मध्ये बदल केला जाईलच, पण इथली वाहने पेट्रोल-डिझेल ऐवजी इथेनॉलवर धावली पाहिजेत, यासाठी तुम्हाला सर्व परवानग्या मी देतो.

गडकरींनी मांडली नवीन पुण्याची संकल्पना
पुणे : इ-चलनचा दंड भरायला न्यायालयात गर्दी

पुण्यात आता खूप दाटीवाटी झाली आहे, त्यामुळे पुणे- बंगलोर महामार्गावर भूसंपादन करून तेथे नवीन पुणे वसवले पाहिजे. शहराचे विकेंद्रीकरण करून ते मेट्रोने जोडल्यास प्रदूषण कमी होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ व नौवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पुणे महापालिकेतर्फे सिंहगड रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे व कात्रज येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

लहानपणची आठवण सांगत गडकरी म्हणाले, ‘‘माझी मोठी बहिण स्वारगेटला राहात होती, त्यामुळे खास सुट्टीत पुण्यात येत. पर्वतीवर जात, तिथे येणारी सुंदर हवा म्हणजे गोड पदार्थ खाल्ल्या सारखा आनंद मिळत होता. पण आता खूप प्रदूषण सुरू झाले आहे.या प्रदूषणामुळे आपण रुग्णालयाची बिले भरत आहोत. नागपूरमध्ये सामाजिक संस्था स्थापन करून प्रदूषण थांबविण्यावर काम सुरू केले आहे. भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पुण्याचा क्रमांक लागत आहे. अजित पवारांमध्ये ताकद आहे, त्यांनी ठरवले तर पुण्याची प्रदूषणातून सुटका करू शकता, असेही गडकरी म्हणाले.

यावर्षी आम्ही ४० हजार कोटी रुपयांचा ‘पुणे-बंगलोर हा द्रुतगती मार्ग बांधण्याचे काम सुरू करणार आहोत. महामार्ग तयार होणार म्हणाले की पुढील लोक तेथील जागा विकत घेतात, त्यापेक्षा सरकारने जागा विकत घ्यावी. या रस्त्यावर नवीन पुणे बसवा हे शहर मेट्रोने जोडू. मोठ्या शहराचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. आता पुण्यात खूप दाटीवाटी झाली आहे. त्याचा विचार करा. मला पेट्रोल डिझेल बंद करायचे आहे.

इथेनॉलचे वापर झाला पाहिजे. ब्राझिल मध्ये १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत. ६५ रुपये लिटर इथेनॉल मिळते. रशियातून तंत्रज्ञान आणले आहे. पुण्यात तीन पंप इथेनॉल पंप सुरू झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पंप सुरू करा. साखर उत्पादन ऐवजी इथेनॉल निर्मिती केल्यास कारखान्याची स्थिती सुधारेल व लोकांना महाग पेट्रोल घ्यावे लागणार नाही. पुण्यात प्रदूषण मुक्त करायचे असले तर इथेनॉल वापर झाला पाहिजे. फ्लेक्स इंजिनच कंपन्यांना बनविले पाहिजे. असा आदेश काढणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनिल टिंगल, चेतन तुपे, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधीपक्षेत्या दीपाली धुमाळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार आदी उपस्थित होते.

पर्वतीवर रोप वे

मी परिवहन मंत्री असल्याने तुमची जी काही कामे अडकली आहेत ती मार्गी लावून घ्या, खासदार बापट यांनी सिंहगडावर रोप वे करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे पर्वतीवर रोप वे करण्यासाठी आमदार मिसाळ यांच्याशी चर्चा केली आहे. तुम्ही मला प्रस्ताव द्या, सगळे प्रस्ताव मंजूर करून प्रकल्प करू, असे आश्‍वासन गडकरी यांनी दिले.

उड्डाणपुल दोन मजली करा

सिंहगड रस्त्यावर उभारण्यात येणारा उड्डाणपूल आहे, पण हा उड्डाणपुल आहे. मलेशिया, अमेरिकेत ज्या पद्धतीने पूल बांधकात तसेच पूल दोन मजील करणे शक्य आहे. पहिला पूल हा ठिकठिकाणी उतरणाऱ्यांसाठी तर दुसरा पूल हा थेट जाणाऱ्यांसाठी असेल. याचा विचार महापौर आणि आयुक्तांनी करावा, अशी सूचना गडकरी यांनी केली.

‘‘पुण्यात वेगेवेगळी काम सुरू आहेत काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे हे ठेकेदाराने लक्षात घ्यावे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, यासाठी महापालिका व ठेकेदाराने लक्ष द्यावे. कात्रज येथील उड्डाणपुल दोन मजली केला पाहिजे. राज्य सरकारचे प्रलंबित प्रश्न महाविकास आघाडी सोबत बैठक लावा अशा सूचना गडकरी यांनी केली. यावर सह्याद्रीवर प्रश्नांची बैठक घेतली जाईल. राज्य व महापालिकेचे समन्वय पाहिजे. विकास कामात राजकारण नको.’’- अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘‘सिंहगड रस्ता ते पुणे स्टेशन असा नदी पात्रातून इलेव्हेटेड रस्ता झाला पाहिजे. तर वाहतूक आणखी सुरळीत होईल. विकास कामासाठी अजित पवार पैसे कमी पडू देत नाहीत. तसेच नितीन गडकरी हे देखील आम्हाला निधी कमी पडत नाही, कुठल्या पोठडीतून पैसे काढता माहिती नाही. सिंहगडावर जाण्यासाठी रोप वे झाला पाहिजे, यासाठी राज्याने व केंद्राने निधी द्यावा.’’ - गिरीश बापट, खासदार

‘‘पुणे-सातारा महामार्गाचे काम लवकर व्हावे, मढे घाटाचे काम लवकर पूर्ण होऊन त्यास तानाजी मालुसरे घाट असे नाव द्यावे. महाड-पंढरपूर रस्ता, वरंधा घाटातील दोन पूल, मुळशीतील घोटावडे फाटा येथे उड्डाणपूलाची मागणी आहे, फुरसुंगीमध्ये पुलाचे रुंदीकरण करावे. कात्रज ते नवले पूल या कामास विलंब होत आहे, त्यास गती द्यावी.’’ - सुप्रिया सुळे, खासदार

‘‘पुण्यातील पर्यावरणावर काम करण्यासाठी खूप संघटना आहेत, पण सरकारने योग्य निर्णय घेतला नसल्याने या संघटना न्यायालयात जातात. त्यामुळे संवाद साधून धोरणात्माक निर्णय घेतला पाहिजे. राज्यातील प्रश्‍न घेऊन गडकरी यांना दिल्लीत भेटण्यासाठी लोक जातात, पण अशीच व्यवस्था मुंबईत निर्माण करावी.’’ -डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com