पुणे : इ-चलनचा दंड भरायला न्यायालयात गर्दी; पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नागरिकांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : इ-चलनचा दंड भरायला न्यायालयात गर्दी

पुणे : इ-चलनचा दंड भरायला न्यायालयात गर्दी

पुणे: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आकारलेले इ-चलन भरण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात आज सकाळपासूनच गर्दी केली आहे. दंडाचे प्रकरण निकाली लावण्यासाठी न्यायालयात पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून न देण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सकाळपासून अनेक वाहनचालक रांगेत ताटकळत उभे आहेत. दंड भरण्यासाठी आलेल्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे.

हेही वाचा: पुणे प्रदुषणात अग्रेसर, अजित दादा तुम्ही प्रदुषणमुक्ती द्या - गडकरी

वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दोन लाखांहून अधिक दावे २५ सप्टेंबर रोजी आयोजित लोकअदालतीत निकाली काढण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘सामा’ या खासगी कंपनीच्या माध्यमातून दंड झालेल्या वाहनचालकांना मेसेजद्वारे नोटीस पाठविण्यात येत आहे.

या नोटिशीत ‘वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून मोटार वाहन कायद्यानुसार शिक्षापात्र व तडजोडपात्र अपराध केल्याबद्दल ऑनलाइन पेमेंट माध्यमातून अथवा जिल्हा न्यायालयातील मोटार वाहन न्यायालय येथे चलनाची रक्कम भरावी, देय रक्कम अथवा तडजोड शुल्क वेळेत न भरल्यास हे प्रकरण लोक न्यायालयाच्या पटलावर घेण्यात येईल’ असे नमूद करण्यात आले आहे.

शहरातील शेकडो नागरिकांना अशा प्रकारे मेसेजद्वारे नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. दंड न भरल्यास पुढील कारवाई टाळण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी न्यायालयात दाखल होत दंड भरण्यास सुरुवात केली आहे.

दंड भरण्यासाठी ऑनलाईन देखील सोय -

वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड भरण्यासाठी ऑनलाईन देखील सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागरिकांना आलेल्या मेसेजमध्ये याबाबतची लिंक देखील देण्यात आली आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष न्यायालयात येण्याऐवजी ऑनलाईन पैसे भरले तरी त्यांचे प्रकरण मिटणार आहे, असे पोलिस प्रशासनाकडून कळविण्यात आले.

ऑनलाइन दंड भरण्यासाठी लिंक -

https://mahatrafficechallan.gov.in/payechallan/PaymentService.htm?_qc=a2c2493d7d35edb961655e9b0473968f

"दीड तास झाला मी दंड भरण्याच्या रांगेत उभा आहे. पुरेसे कर्मचारी नसल्याने ताटकळत थांबावे लागत आहे. अनेक सीनियर सिटीजन देखील दंड भरण्यासाठी आले आहेत. त्यामुळे सीनियर सिटीजन आणि महिलांसाठी याठिकाणी स्वतंत्र रांग असायला हवी. दंडाच्या पावत्या पाठवल्यानंतर गर्दी होणार हे लक्षात घेत पोलीस प्रशासनाने या ठिकाणी योग्य ती सर्व खबरदारी घेणं गरजेचं होतं."-सुभाष इनामदार, दंड भरण्यासाठी आलेले नागरिक

"मी जवळपास दोन तास रांगेत उभे होते. दंड त्यानंतर स्वीकारला गेला. अडीचशे ते तीनशे नागरिक रांगेत असताना फक्त दोन कर्मचाऱ्यांवर येथील कामकाज सुरू आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून द्यायला हवेत."-पूजा साठे, दंड भरण्यासाठी आलेल्या दुचाकीधारक

loading image
go to top