
Ganesh Festival 2025
esakal
पुणे : ‘उत्सवाचं नियोजन’ हा मुद्दा तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अगदी सुरुवातीपासूनच कळीचा ठरलेला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, उत्सवाची प्रेरणा आणि उद्दिष्ट सगळ्या प्रमुख धुरीणांना अगदी स्पष्ट होतं. आपण हा उत्सव का करतो आहोत, त्याचं धोरण काय, समाजमन घडवण्याची आपली दिशा कोणती, यावर अतिशय स्पष्ट आणि ठाम भूमिका ठरलेली होती. समाजाचं एकत्र येणं, त्यांना सांस्कृतिक, वैचारिक आणि राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव करून देणं, प्रत्येक व्यक्तीमध्ये सक्रियता निर्माण करणं, ही त्या काळातली उद्दिष्टं आजही पूर्णत्वाला गेलेली नाहीत. त्यासाठी नित्यनिरंतर काम करत राहणं किती गरजेचं आहे, हे लोकमान्य टिळक जाणून होते.