

पुणे, ता. ३० : गणेशोत्सवाची चाहूल लागताच मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये रविवारी खरेदीला उधाण आले होते. सुट्टीचा दिवस साधत सकाळपासूनच तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, बोहरी आळी, कुमठेकर रस्ता आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. एका बाजूला घरगुती गणपतीच्या स्वागताची तयारी, तर दुसरीकडे गणेश मंडळांच्या सजावटीची लगबग, अशा उत्साही वातावरणामुळे दिवसभर बाजारपेठ गजबजली होती.
गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेले सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. विविध आकारांची तोरणे, फुलांच्या माळा, पडदे, कापड, कृत्रिम फुले, झेंडूच्या माळा, रंगीबेरंगी लाइटिंग, एलईडी माळा, सजावटीच्या छत्र्या, मखरासाठी लागणारे साहित्य, विविध प्रकारच्या कागदी, पुठ्ठ्याच्या व पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याला मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही नागरिक घरातील गणपतीसाठी साधी आणि पारंपरिक सजावट पसंत करत होते, तर काही जण आकर्षक आणि हटके थीमसाठी साहित्य शोधताना दिसत होते.
सजावटीचे असंख्य पर्याय
यंदा बाजारपेठेत पारंपरिक फुलांच्या माळा, कापडी तोरणे, समई, सजावटीच्या वस्तूंसोबतच एलईडी लाइटिंग, आधुनिक मखर, थीमवर आधारित डेकोरेशन आणि आकर्षक कृत्रिम फुलांच्या सजावटीला मागणी आहे. पर्यावरणपूरक साहित्यालाही ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठांमध्ये साधेपणापासून भव्यतेपर्यंत सजावटीचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. कमी किमतीत चांगले आणि आकर्षक साहित्य कुठे मिळेल, याचा शोध अनेक नागरिक घेत होते तर काही जण आधीच यादी तयार करून बाजारात आले होते.
कमी किमतीत विविध पर्याय
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात यंदा सजावटीच्या साहित्याची मोठी विविधता उपलब्ध झाली आहे. कमी किमतीपासून प्रीमियम श्रेणीपर्यंत विविध पर्याय असल्याने प्रत्येकाच्या बजेटनुसार खरेदी करता येत आहे. काही ठिकाणी छोट्या सजावटीच्या वस्तू २० ते ५० रुपयांपासून उपलब्ध आहेत, तर मोठे मखर, आकर्षक तोरण, फुलांच्या माळा आणि विशेष डेकोरेशनचे साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे कमी खर्चात घराचा कोपरा सजविण्यापासून मोठ्या प्रमाणात सजावट करण्यापर्यंत नागरिकांना पर्याय मिळत आहेत. विशेषतः रंगीबेरंगी एलईडी लाइट्स, पडद्यावरील लाइटिंग, फुलांच्या माळा आणि विविध थीमसाठी वापरता येणाऱ्या सजावटीच्या वस्तूंना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. घरगुती गणपतीसाठी लहान आकारातील मखर, कृत्रिम फुलांची सजावट आणि रेडिमेड डेकोरेशन किटही उपलब्ध आहेत.
मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही लगबग
घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही बाजारपेठांमध्ये लगबग सुरू झाली आहे. मांडव उभारणीसाठी लागणारे कापड, पडदे, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा तसेच विविध डेकोरेशनच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते बाजारात फिरताना दिसत होते. यंदाच्या सजावटीसाठी नेमकी कोणती थीम असावी, त्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य आवश्यक आहे, याची चर्चा करत कार्यकर्ते दुकानदारांकडून साहित्याची माहिती घेत होते.
मध्यवर्ती पेठांमध्ये कोंडी
बाजारपेठांमध्ये वाढलेल्या गर्दीचा परिणाम वाहतुकीवरही झाला. रविवार पेठ, बोहरी आळी आणि लक्ष्मी रस्ता परिसरात नागरिकांची गर्दी तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांमुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला. साहित्य उतरविण्यासाठी उभी असलेली वाहने, दुचाकींची गर्दी आणि पादचाऱ्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे काही वेळ वाहतूककोंडी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.