बाप्पा गेले गावाला...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 September 2018

गणेशोत्सव मंडळ गणपती विसर्जन - २३७५
घरगुती गणपती विसर्जन - १, ४१,७२४
टिळक चौकात येऊन  विसर्जन करणारी मंडळे - ३०१
श्रींचे जागेवर विसर्जन करणारी मंडळे  - २४
मिरवणूक मार्गांनी आलेली गणेशमंडळे - 
 लक्ष्मी रस्ता - १३१
 टिळक रस्ता - ६८
 कुमठेकर रस्ता - ४६
 केळकर रस्ता - ५६

पुणे - उत्साह, जल्लोष आणि नागरिकांच्या अलोट गर्दीमध्ये गणरायाला दिमाखदार मिरवणुकीद्वारे रविवारी निरोप देण्यात आला. डीजे बंदीचे सावट मिरवणुकीवर असले, तरी अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघन झाल्याचे चित्रही यंदा दिसून आले. मिरवणूक रेंगाळू नये, यासाठी केलेले नियोजन ढोल-ताशांच्या पथकांमधील वादकांच्या संख्येवरील नियंत्रणाअभावी ते कोलडले. पोलिसांच्या काटेकोर बंदोबस्तामुळे एक-दोन अपवाद वगळता अनुचित घटना घडल्या नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विसर्जन मिरवणूक सुमारे ३५ मिनिटे लवकर आटोपली, हाच दिलासा मिळाला.

यंदा अकरा दिवसांच्या उत्सवाच्या समारोपात लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सुमारे तीन हजार १४६ मंडळांनी भाग घेतला. त्याशिवाय उपनगरांतही विसर्जन उत्साहात पार पडले. मिरवणुकीनंतर उपनगरांतील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होती. यंदा विसर्जनादरम्यान पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उत्साहात भर पडली. डीजेवरील स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे त्याच्या नियमांची अंमलबजावणी पोलिसांनी केली. त्यामुळे काही गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, यंदा ध्वनिप्रदूषणही गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसे घटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मानाच्या पाचही गणपतींनी मिरवणुकीमध्ये अंतर पडणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे जाहीर केले होते. परंतु, ते फोल ठरले. रविवारी सकाळी साडेदहाला विसर्जन मिरवणूक सुरू झाली. मानाचा पाचवा गणपती सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी विसर्जित झाला. मानाचे गणपती सुमारे साडेआठ तास विसर्जन मिरवणूक मार्गावर होते. तर, मिरवणुकीचे आकर्षण असलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, बाबू गेनू, भाऊ रंगारी, जिलब्या मारुती मंडळ यंदा बेलबाग चौकातून सायंकाळी सव्वासात ते रात्री अकराच्या सुमारास रवाना झाले. 

दगडूशेठ हलवाई गणपती पहाटे चार वाजून ५८ मिनिटांनी विसर्जित झाला. त्यानंतर सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता शेवटचा गणपती विसर्जित झाला. मंडई आणि दगडूशेठ गणपती मंडळे बेलबाग चौकातून नेहमीपेक्षा लवकर म्हणजेच रात्री १० ते १०.३० च्या सुमारास रवाना झाल्यामुळे मिरवणूक लवकर संपेल, अशी शक्‍यता होती. परंतु, पथकांची संख्या, दोन मंडळांमधील वाढते अंतर यामुळे मिरवणूक नेहमीच्याच ‘मार्गा’ने गेली. 

ढोल-ताशाच्या पथकांतील वादकांच्या संख्येवर नियंत्रण नसल्यामुळे दोन मंडळांमध्ये अंतर पडण्याची परंपरा यंदाही कायम राहिली.  टिळक, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावर काही मंडळांनी डीजेबाबत न्यायालयाच्या निर्णयाकडे काणाडोळा केला. तर, काही मंडळांनी नाराजी व्यक्त करीत विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. बहिष्काराची मात्रा मिरवणुकीत चालली नाही. 

प्रमुख मंडळांचे विसर्जन झाल्यावर विसर्जन मिरवणुकीला पोलिसांनी वेग ‘आणला.’ रात्री बारानंतर पहाटे सहा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक बंद होते. त्यामुळे पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला. पहाटेनंतर सकाळी काही मंडळांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, दिवस उजाडू लागला तशी मिरवणूक आटोपती झाली. शेवटचा महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता विसर्जित झाला अन्‌ रस्ते वाहतुकीसाठी खुले होत गेले. खडकवासला धरणातून विसर्जनासाठी सोडण्यात येणारे पाणी यंदा न सोडल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.

विसर्जन मिरवणुकीचा कालावधी
2018 - २६ तास ३६ मिनिटे
2017 - 28 तास ५ मिनिटे
2016 - 28 तास ३० मिनिटे
2015 - 28 तास २५ मिनिटे
201४ - 2९ तास १२ मिनिटे

मिरवणुकीची वैशिष्ट्ये 

- ढोल-ताशा पथकांमुळे दोन मंडळांतील अंतर वाढले 
- पोलिसांच्या पुढाकारामुळे प्रमुख मंडळे लवकर मार्गस्थ 
- डीजेबंदीबद्दल अनेक मंडळांकडून नाराजी व्यक्त 

गणेशोत्सव मंडळ गणपती विसर्जन - २३७५
घरगुती गणपती विसर्जन - १, ४१,७२४
टिळक चौकात येऊन  विसर्जन करणारी मंडळे - ३०१
श्रींचे जागेवर विसर्जन करणारी मंडळे  - २४
मिरवणूक मार्गांनी आलेली गणेशमंडळे - 
 लक्ष्मी रस्ता - १३१
 टिळक रस्ता - ६८
 कुमठेकर रस्ता - ४६
 केळकर रस्ता - ५६


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh immersion ceremonies in pune